...जेव्हा पर्रीकरांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करून भाजप पराभूत झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:03 PM2019-03-18T15:03:47+5:302019-03-18T15:06:34+5:30
संकटांसमोर पाय रोवून उभा राहणारा नेत्याचा राजकीय प्रवास
- सदगुरू पाटील
मनोहर पर्रीकर यांची राजकीय कारकीर्द ही पंचवीस ते सव्वीस वर्षांची. १९९४ साली त्यांनी पहिले यश पाहिले. त्या साली ते पणजीचे आमदार झाले. भाजप व मगोपची त्या वेळी युती होती व पर्रीकर यांनी पणजीतून निवडणूक लढवावी असे ठरले. आपल्या आयुष्यातील पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पर्रीकर जिंकले व विधानसभेत पोहचले. देशाच्या संरक्षणमंत्रिपदापर्यंत पोहचून आलेल्या या नेत्याची राजकीय कारकीर्द ही केवळ यशानेच भरलेली नाही. ती खूप कष्टांनी, संघर्षाने व बऱ्याच चढउतारांनी भरलेली आहे. अनेकांना ठाऊक नसेल; पण पर्रीकर यांनी प्रथम लोकसभा निवडणूक लढवली होती. रमाकांत खलपांनी ९० च्या दशकात पर्रीकर यांचा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात पराभव केला होता.
स्व. प्रमोद महाजन त्या वेळी महाराष्ट्रात राहून गोव्यातील भाजपचे काम पाहत होते. पर्रीकर, श्रीपाद नाईक आदींना ते मार्र्गदर्शन करत होते. वास्तविक लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार शोधण्याची जबाबदारी स्व. प्रमोद महाजन यांनी पर्रीकर यांच्यावर सोपवली होती. भाजपची त्या वेळी गोव्यात काहीच वाढ झाली नव्हती. पर्रीकर लोकसभेसाठी उमेदवार शोधत होते. कुणीच उमेदवार मिळाला नाही तेव्हा महाजन यांनी तुम्हीच तिकीट स्वीकारा, असे पर्रीकर यांना सांगितले व पर्रीकर यांचा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून प्रवेश सुरू झाला. लोकसभा निवडणुकीत ते हरल्यानंतर गोव्यात ९४ साली लगेच विधानसभा निवडणूक आली. पर्रीकर विधानसभेत पोहचले त्या वेळीच भाजपचे त्यांच्यासोबत अन्य तीन आमदार विधानसभेत पोहचले होते. श्रीपाद नाईक हे भाजप विधिमंडळ गटाचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पर्रीकर यांनी काम केले. मगोपचे स्व. डॉ. काशिनाथ जल्मी हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते व राज्यात प्रतापसिंग राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार होते. पर्रीकर यांनी विधानसभेत लढवय्ये नेते अशी आपली प्रतिमा अवघ्या तीन वर्षांत तयार केली. पर्रीकर आक्रमकपणे काँग्रेसच्या काही मंत्र्यांवर विधानसभेत बोलू लागले व राज्यातील प्रसारमाध्यमांचे व लोकांचे लक्ष या नेत्याकडे वळले. हा लांब पल्ल्याच्या शर्यतीतील घोडा आहे याची खात्री लोकांना पर्रीकर यांची पाच वर्षांतील आमदारकीच्या काळातील कामगिरी पाहून पटली.
पर्रीकर यांचा राजकीय प्रवास हा सोप्या पद्धतीने झालेला नाही. पर्रीकर एका टप्प्यावर राजकीयदृष्ट्या जेरीस आले होते; पण त्यांचे बलस्थान म्हणजे त्यांची सकारात्मक वृत्ती. २००७ साली पर्रीकर यांना मुख्यमंत्री म्हणून भाजपने प्रोजेक्ट केले; पण ती निवडणूक भाजप हरला. त्यानंतर राजेश पाटणेकर व दयानंद सोपटे हे दोन भाजप आमदार पक्ष सोडून जाण्याची प्रक्रिया सुरू होऊ लागली. २०१२ सालच्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही आमदारांनी भाजपला रामराम ठोकला. पर्रीकर त्या वेळी हताश झाले होते. त्या वेळी केंद्रात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली यूपीएची सत्ता होती.
मात्र, पर्रीकर यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी गोव्यातील काँग्रेस सरकारविरुद्ध आणि दिगंबर कामत नेतृत्वाविरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषाला वेगळे वळण देत राजकीय स्थिती भाजपसाठी व स्वत:साठी अनुकूल बनवली. त्यामुळे पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली २०१२ च्या निवडणुकीत भाजपने बहुमत प्राप्त केले व काँग्रेस पक्ष गारद झाला. पाटणेकर व सोपटे हे दोघेही त्या वेळी पराभूत झाले.
पर्रीकर हे कधीच मुख्यमंत्रिपदाचा आपला पाच वर्षांचा पूर्ण कालावधी यशस्वीपणे पूर्ण करू शकले नाहीत. त्यांची कारकीर्द कायम अर्धवट राहिली. आपलेच सहकारी आपले सरकार पाडतात, आपले सरकार त्यांच्यामुळे अल्पमतात येते, असा कटू अनुभव पर्रीकर यांना आला. पर्रीकरांना एकदा विधानसभा अचानक विसर्जित करावी लागली होती. २०१२ साली त्यांनी भाजपला बहुमत मिळवून दिले तरी, २०१४ साली मुख्यमंत्रिपद अर्ध्यावर सोडून पर्रीकर यांना केंद्रीय संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत जावे लागले. खरे म्हणजे पर्रीकर यांना दिल्लीत जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यांना गोव्याचे मुख्यमंत्री म्हणूनच काम पुढे न्यायचे होते. २०१७ साली विधानसभा निवडणुकीत भाजप हरला. पुन्हा पर्रीकर याना केंद्रातील संरक्षणमंत्रिपद सोडून गोव्यात यावे लागले. मुख्यमंत्री म्हणून ते कारकिर्दीचे एक वर्ष पूर्ण करत असतानाच त्यांना आजाराने गाठले.