पणजी : घरगुती पाण्याच्या जोडण्या हॉटेल्स तसेच अन्य व्यावसायिक आस्थापनांसाठी वापरून सरकारचा महसूल बुडविणारी दोन हजारांहून अधिक प्रकरणे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणली आहेत. या सर्वांना आता व्यावसायिक दर आकारण्यात येत असल्याने महसुलात वार्षिक सुमारे १५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता दत्तात्रय बोरकर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. कळंगुट, कांदोळी, बागा, मोरजी, कोलवा, बाणावली आदी किनारी भागांमध्ये असे प्रकार जास्त आढळून आले आहेत. घरासाठी म्हणून जोडण्या घ्यायच्या आणि नंतर घराचे हॉटेलात किंवा रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करून व्यावसायिक कामासाठी या पाण्याचा वापर करायचा, असे प्रकार चालू होते. व्यावसायिक वापरासाठी पाण्याचे दर जास्त आहेत. त्यामुळे खात्याचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत होता. असा बेकायदा वापर करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी खास पथके नेमण्यात आली होती. पाहणीत किनारी भागातच असे अधिकाधिक प्रकार आढळून आले. किनारपट्टीत पर्यटकांकडून बक्कळ पैसा मिळत असल्याने घरांचे हॉटेल्समध्ये रूपांतर करणे तसेच खोल्या भाड्याने देण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. बोरकर यांनी सांगितले की, पाणीपट्टीतून वार्षिक सुमारे १00 कोटी रुपये महसूल मिळत होता. आज तो ११५ कोटींवर पोचला आहे. जोडण्यांचा गैरवापर करणाऱ्यांविरुध्दची मोहीम चालूच राहणार आहे. (प्रतिनिधी)
घरगुती पाण्याचा हॉटेल्ससाठी वापर
By admin | Published: August 20, 2015 2:18 AM