- महाराष्ट्राचे कर्जत- ३ बियाणेही मानवले : पाऊस भातशेतीला पूरक पणजी : गोव्यात केरळच्या लाल दाण्याच्या माकम, कुंजुकुंजु या भातबियाण्यांचा प्रयोग या खरिप मोसमात घेतला जात आहे. राज्यात गेले काही दिवस पावसाची संततधारचालूच असली तरी त्याचा भात शेतीवर कोणताही परिणाम होणार नसून उलट हा पाऊस लाभदायकच ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. येथील कृषी खात्याचे संचालक उल्हास पै काकोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हा पाऊस शेतीला लाभदायकच आहे. यावर्षी केरळची लाल दाण्याची माकम, कुंजुकुंजु ही भात बियाणी प्रयोगासाठी घेतलेली आहेत. गोव्याच्या पारंपरिक ज्योती बियाण्याला पर्याय म्हणून या बियाण्यांकडे पाहिले जाते. गेल्या वर्षीही काही भागात लागवड केली असता गोव्याची हवा या बियाण्याला मानवल्याचे दिसून आले. राज्यातील सासष्टी, तिसवाडी, बार्देस आदी किनारी भागात भात बियाण्याची लागवड पूर्ण झालेली आहे. भात रोपट्यांच्या लागवडीसाठी यावर्षी ट्रान्सप्लांटर आणला असून आता यंत्रवत लागवडीचा मार्गही खुला झाला असल्याचे काकोडे म्हणाले. सासष्टी आणि बार्देस तालुक्यांमध्ये शेतात ट्रान्सप्लांटरचा प्रयोग घेतलेला आहे. राज्यात गेल्या वर्षी सुमारे ३१ हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड झाली होती यंदा लागवड क्षेत्रात वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. कंत्राटी शेतीला प्रोत्साहन देणे हा त्याचाच एक भाग आहे. याआधीही कर्नाटक, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भातबियाण्यांचा यशस्वी प्रयोग गोव्यात झालेला आहे. केरळचे रेवती, महाराष्ट्राचे कर्जत-३ ही बियाणीही शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहेत. कमी पाण्यात तग धरणारी आणि बऱ्यापैकी पिक देणारी बियाणी शेतकरी पसंत करीत असतात. पारंपरिक जया आणि ज्योती या बियाण्यांना पर्याय म्हणून अशा नवनव्या बियाण्यांचा प्रयोग राज्यात होत आहे आणि त्याला येथील शेतकरीही चांगला प्रतिसाद देत आहेत.
गोव्यात केरळच्या माकम, कुंजुकुंजु भातबियाण्यांचा प्रयोग
By admin | Published: June 28, 2016 7:27 PM