पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या सत्रात मते मिळविण्यासाठी अन्य पक्षांचे उमेदवार तसेच काही अपक्षांनीही पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचा आरोप ‘आप’चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तथा कुंकळ्ळीचे उमेदवार एल्विस गोम्स यांनी केला आहे.राजकीय पक्षांकडून मद्याचाही वापर झाला. निवडणूक आयोगाचे अधिकारी हे प्रकार रोखू शकले नाहीत, असे गोम्स यांचे म्हणणे आहे. पैशांचा वापर रोखण्याचे आयोगाचे उद्दिष्ट धुळीस मिळाले, अशी टीका त्यांनी केली. या निवडणुकीत ‘सायलंट’ मतदान झाले असून ते ‘आप’साठी फायद्याचे असल्याचा दावा त्यांनी केला. निकाल असे लागतील की, भ्रष्ट राजकारण्यांच्या गालावर थप्पड पडेल, असे ते म्हणाले.उमेदवार घरोघरी भेट देणार मंगळवारी ‘आप’चे उमेदवार, प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक झाली. पुढील दोन ते तीन आठवडे घरोघरी भेट देऊन मतदारांचे आभार मानण्याचे त्यात ठरले. येथील संस्कृती, वारसा जपण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे नमूद करताना लोकांनी बदलासाठी ‘आप’ला मतदान केल्याचे गोम्स यांनी सांगितले. लोकांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात बदल घडवून आणण्याबरोबरच येथील जमिनी, संस्कृती, वारसा जपण्याचे आश्वासन पक्षातर्फे दिले गेले. लोकांनी त्याल प्रतिसाद देत पक्षाला भरभरून मतदान केल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘आप’चे राष्ट्रीय सचिव तथा गोवाप्रमुख पंकज गुप्ता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. मुख्य प्रवक्ते डॉ. आॅस्कर रिबेलो, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिनेश वाघेला यांनीही मार्गदर्शन केले.
गोवा निवडणुकीत पैशांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2017 5:25 AM