पणजी : लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. तसेच मतदारांनी या निवडणुकांवेळी फोटो मतदार ओळखपत्र (एपीक कार्ड) सादर करावे किंवा ते सादर करू न शकणा-या मतदारांनी एकूण अकरा पर्यायांपैकी एक कोणताही पुरावा सादर करावा, असे आयोगाने एका आदेशाद्वारे कळविले आहे.गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. कुणाल यांनी निवडणूक आयोगाचा आदेश सोमवारी राजपत्रत अधिसूचित केला आहे. ज्या मतदारांना निवडणूक आयोगाने फोटो मतदार ओळखपत्र दिलेले आहे, त्यांनी एपीक कार्ड सादर करावे. जर ते सादर करू शकले नाहीत तर त्यांनी अकरापैकी कोणताही एक पुरावा सादर करून मतदानावेळी स्वत:ची ओळख पटविणो गरजेचे आहे, असे आयोगाने म्हटले आहे. एखाद्या एपीक कार्डवरून जर मतदाराची ओळख पटत असेल तर मग त्या कार्डावरील अक्षर चूक किंवा कार्डावरील अन्य एखादी टायपिंग चूक वगैरे नगण्य मानली जावी, त्याकडे दुर्लक्ष केले जावे, असे आयोगाला अपेक्षित आहे. पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र किंवा राज्य सरकारने किंवा पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी किंवा सार्वजनिक आस्थापनांनी फोटोसह कर्मचा-याला दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाने दिलेले पासबूक (फोटोसह), पॅन कार्ड, एनपीआरखाली आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, मजूर मंत्रालयाच्या योजनेखाली दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, फोटोसह असलेले पेन्शनविषयक कागदपत्र, आमदार, खासदारांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे व आधार कार्ड यापैकी एक कोणताही पुरावा मतदाराला सादर करावा लागेल. लोकसभेसोबतच गोव्यात विधानसभेच्या रिक्त मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होतील हे स्पष्ट झाले आहे. येत्या दि.9 पर्यंत कधीही निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होऊ शकते, असे सुत्रांनी सांगितले.
मतदार ओळखपत्र वापरा अथवा अन्य पर्याय स्वीकारा - निवडणूक आयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 8:27 PM