म्हापसा : ठरावीक दिवसांसाठी मुंबईतून मुलींची आयात करणे स्पाच्या नावाखाली देहविक्रीच्या व्यवसायासाठी त्यांचा वापर करणे ठरलेल्या ग्राहकांना त्यांना पुरवणे व नंतर त्यांची रवानगी ठरावीक काळानंतर पुन्हा मुंबईला करणे असे प्रकार सध्या सेक्स रॅकेट किंवा स्पाच्या नावाखाली कळंगुट परिसरात घडू लागले आहेत. मागील चार दिवसात केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन युवतींची सुटका करण्यात आली आहे. तर यात गुंतलेल्या सहा दलालांना अटक करण्यात आली.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्व असलेल्या कळंगुट भागात हे अनैतिक प्रकार वाढू लागले आहेत. तीन दिवसापूर्वी क्राईम ब्रँचने कळंगुट नजिक असलेल्या साळगावात स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी धाड घालून एका युवतीची सुटका केली होती, तर तिघा दलालांना अटक केली होती. दोन दिवसापूर्वी केलेल्या दुसऱ्या कारवाईत कळंगुट पोलिसांनी येथील एका तारांकित हॉटेलात सुरु असलेल्या उच्चभ्रु सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यात त्यांनी तीन दलालांसहित चार ग्राहकांना ताब्यात घेतले होते तर दोन युवतींची या प्रकरणातून सुटका केली होती.
निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलले दलाल युवतींना विमानातून किंवा खास गाडीतून एका आठवड्यासाठी मुंबईतून गोव्यात आणतात. त्यासाठी त्यांना आगाऊ ठरलेली रक्कम दिली जाते. आणलेल्या युवतींची हॉटेलात व्यवस्था केली जाते. नंतर निश्चित केलेल्या ग्राहकांना त्या युवतींना पुरवले जाते. स्पाच्या नावाखाली युवतींना आणल्यास त्यांना स्पात पाठवून नंतर त्यांचा वापर वेश्या व्यवसायासाठी केला जातो.
आयात करण्यात येत असलेल्या युवतींची दुसऱ्या व्यक्ती बरोबर ओळख होऊ नये किंवा त्यांनी दुसऱ्या व्यक्ती बरोबर स्वत:चे नाते जुडवू नये याची काटेकोरपणे दक्षता बाळगली जाते. त्यासाठी फक्त आठ किंवा दहा दिवसांच्या भाडेपट्टीवर त्यांना गोव्यात आणल्यानंतर आणलेल्या काळात त्यांचा वापर करुन घेतल्यानंतर ठरलेल्या दिवसात त्यांची पुन्हा रवानगी मुंबईत केली जाते. त्यानंतर मुंबईतून पुन्हा दुसºया युवतींना आणून त्यांच्याशी सुद्धा हाच प्रकार केला जातो.
स्पाच्या नावाखाली आणलेल्या युवतींचा थोडा वेगळ्या प्रकारे वापर केला जातो. त्यांची रवानगी ठरलेल्या स्पा सेंटरमध्ये केली जाते. आलेले ग्राहक पटले तर स्पा सेंटरच्या बाजूलाच असलेल्या किंवा जवळपास दलालांच्या मर्जीतल्या एखाद्या गेस्ट हाऊसात किंवा हॉटेलात त्यांना ग्राहका सोबत पाठवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय केला जातो. असे धंदे या दलालांकडून केले जातात. किनारी भागातील अनेक स्पा व्यवसाय बिनधक्कपणे भरवस्तीत सुरु आहेत मात्र वेश्या व्यवसाय जास्त प्रमाणावर वस्ती बाहेर चालवला जातो.
वेश्या व्यवसायासाठी युवतींना आणणारे हे दलाल त्यांच्या नावावर लाखो रुपयांची कमाई करतात. त्या युवतींना अनेकवेळा त्यांची ठरलेली रक्कम दिली जात नसते. त्यामुळे त्यांना मिळत असलेल्या तुंटपूजीवर समाधान मानून घ्यावे लागते. या व्यवसायात गुंतलेले जे दलाल आहेत त्यातील जास्त बिगर गोमंतकीय आहेत व अनेक वर्षापासून त्यांनी यात आपले बस्तान बसवले आहे. पकडण्यात आलेल्या दलालातील काही जणांवर अनेकवेळा सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत.
इथल्या स्थानिक व्यवसायीकाला हाताशी धरुन ते हा व्यवसाय चालवतात. हे दलाल सततपणे आपला व्यवसाय बिनबोभाटपणे एका ठिकाणावरुन दुसºया ठिकाणावर हलवत असतात. ठिकाणे बदलली तरी त्यांची हॉटेल्स मात्र ठरलेली असतात. त्यामुळे काहीवेळा नावातही बदल करुन सुद्धा वावरतात. या दलालातील अनेक जण सुरुवातीच्या काळात गोव्यात आल्यानंतर हॉटेलात लहानशी नोकरी करायला सुरुवात केलेली. त्यात बस्तान बसवल्यानंतर ते या व्यवसायाकडे वळलेले आहेत.