पणजी : प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्र सुरू करण्याचा पहिला मान गोव्यात उसगाव येथे महिला बचत गटाने प्राप्त केला आहे.
बचत गटांसाठी केंद्र सरकारतर्फे ड्रोन योजना सुरू करण्यात आली. या उपक्रमाचे उद्दिष्ट स्वयंसाहाय्य गटांना ड्रोन चालविण्याबाबत सर्वसमावेशक प्रशिक्षण देणे हा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशभरातील महिला बचत गटांना (सेल्फ हेल्प ग्रुप) १५,००० ड्रोन देण्यासाठी १,२६१ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली होती.
ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशके आणि खते फवारणीचे प्रशिक्षण महिला बचत गटांना दिले जाईल. ड्रोनची किंमत प्रत्येकी १० लाख रुपये आहे. खर्चाच्या ८० टक्के भार केंद्र सरकार उचलणार आहे. तर उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना अनुदानातून मिळणार आहे. दरम्यान, उसगाव येथे जेनेरिक औषध दुकानाचे उद्घाटनही करण्यात आले.