Utpal Parrikar Goa Election 2022: गोवा विधानसभा निवडणुकीतील सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे उत्पल पर्रिकर. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांनी पणजी मतदार संघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. भाजपाने त्यांना पणजी ऐवजी इतर दोन मतदारसंघाचे पर्याय दिले असल्याचे गोव्याचे भाजपा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. पण सर्व पर्याय बाजूला सारून त्यांनी पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना काँग्रेस नेते उदय मडकईकरही उत्पल यांच्यासोबत होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले. असे असतानाच आता उत्पल पर्रिकरांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याच्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं.
गोव्याच्या राजकारणात अशी विचित्र परिस्थिती दिसून आली की माझ्यापुढे अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. नाईलाज म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे, असं उत्पल पर्रिकर म्हणाले. "पणजी मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा माझा प्रयत्न असेल. परिस्थितीमुळे मी नाईलाजाने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. पणजीच्या लोकांना उमेदवारांच्या यादीत चांगले पर्याय मिळावेत म्हणून मी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, उत्पल पर्रिकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शेकडो समर्थकांची उपस्थिती होती. यात विशेष बाब म्हणजे उत्पल पर्रिकरांनी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते उदय मडकईकर होते. त्यामुळे गोव्यात राजकीय वातावरण तापलं असून विविध चर्चांना चांगलाच जोर आला आहे. त्याशिवाय भाजपाच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही मांद्रे मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.