पणजी - गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाविरोधात काँग्रेससोबतच त़ृणमूल काँग्रेस, आप, मगोप असे अनेक पक्ष मैदानात उतरल्याने गोवा विधानसभेची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने भाजपासमोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांना तिकीट मिळणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, तिकीट न मिळाल्यास उत्पल पर्रिकर बंडाचा झेंडा उचलण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे.
दरम्यान, उत्पल पर्रिककर यांना तिकीट मिळणार का असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी केवळ मनोहर पर्रिकर यांचा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपात तिकीट मिळू शकत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो, असं विधान केलं होतं. त्याला आता उत्पल पर्रिकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उत्पल पर्रिकर म्हणाले की, मला देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर बोलायचं नाही. मात्र केवळ पर्रिकरांचा मुलगा म्हणून मला तिकीट हवं असतं तर ते मी २०१९ मध्येच मागितलं असतं. भाजपाचे अनेक कार्यकर्ते १९९४ पासून माझ्या वडिलांसोबत काम करत होते, ते आता माझ्यासोबत काम करत आहेत, असं उत्पल पर्रिकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपाकडून गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना काल उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं होतं, ते म्हणाले होते की, मनोहर पर्रिकर यांनी गोव्यामध्ये भाजपाला स्थापित करण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. मात्र केवळ मनोहर पर्रिकर यांचा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपात तिकीट मिळू शकत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे यासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा तो मी घेऊ शकत नाही. तो निर्णय आमचं पार्लामेंट्री बोर्ड आहे, ते त्यासंदर्भातील निर्णय घेईल.