पणजी : उझबेकिस्तानचे पहिले चार्टर विमान ६४ पर्यटकांना घेऊन आज सकाळी मोपा विमानतळावर उतरले. उभयपक्षीय पर्यटन वृद्धीच्यादृष्टीने हा एक सुवर्णक्षण मानला जात आहे.सेंट्रम एअरचे हे चार्टर विमान ताश्कंद येथून आले आहे.
पर्यटन खात्याच्यावतीने पाहुण्यांचे विमानतळावर शाही स्वागत करण्यात आले. उझबेकिस्तानमधील चार्टर ऑपरेटर्सनी गोव्यात विमान सेवा सुरू करण्यास उत्सुकता दर्शविली होती. त्याचाच एक भाग म्हणून ही सेवा सुरु झालेली आहे. गोवा आणि उझबेकिस्तान यांच्यात पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण याबाबत हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी असे म्हटले आहे की,‘ फलदायी सहकार्याची ही सुरुवात आहे. आम्ही उझबेकिस्तान सरकार आणि लोकांसोबत अशा प्रकारच्या आणखी करारांची अपेक्षा करतो. दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि सांस्कृतिक संबंध वाढविण्यात ही बाब महत्त्वपूर्ण ठरली आहे.'
गोव्याच्या पर्यटन खात्याने काही महिन्यांपूर्वी ताश्कंद येथे आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळ्यात भाग घेऊन तेथील नागरिक, ट्रॅव्हल एजंट यांना गोव्याविषयी माहिती दिली होती. पर्यटनमंत्री रोहन खंवटे हेही या मेळ्यात सहभागी झाले होते....