पणजी - लीजची मुदत संपल्याने लीजधारकांना लीजक्षेत्र सोडण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत खाण खात्याकडून देण्यात आली आहे. या संदर्भात खाण खात्याकडून १५९ माजी लीजधारकांना नोटीस बजावली आहे.
तसे न केल्यास माईन्स व मिनरल कायद्याअंतर्गत लीजक्षेत्रातील यंत्रसामग्रीसह लीज ताब्यात घेण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. याबाबत खाण खात्याने ३ एप्रिल रोजी आदेशही जारी केला होता. परंतु आता सार्वजनिक नोटीसही बजावण्यात आली आहे. खाण लिजांची मुदत ३१ मार्च २०२० रोजी संपली होती आणि सरकारने लीजधारकांना त्यांची संबंधित लिजक्षेत्रे खाली करण्याची नोटीस बजावली होती. मागील सूचनेनंतर ६ महिन्यांहून अधिक काळ लोटला असल्याने, सरकारने त्यांना एक महिन्याच्या आत लीजक्षेत्रे रिकामी करण्यास सांगितले आहे.