- मनी एक्स्चेंज आस्थापनांमध्ये नोटांचा अभाव : विदेशी पाहुणे त्रस्त पणजी : नोटाबंदीचा फटका राज्यातील पर्यटन उद्योगालाही बसला असून हॉटेलांमधील सरासरी २५ टक्के खोल्या रिकामी आहेत. किनारे, धार्मिक स्थळे तसेच पर्यटनस्थळांबरोबरच कसिनो आणि बाजारपेठांमध्येही पर्यटकांचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. विदेशी पर्यटकांना चलन बदलून घेण्याच्या बाबतीत मोठी समस्या निर्माण झाली आहे. मनी एक्स्चेंज आस्थापनांमध्ये डॉलर्स, पौंड किंवा अन्य विदेशी चलनाच्या बदल्यात भारतीय नोटा देण्यासाठी उपलब्ध नाहीत. विदेशी पाहुण्यांना आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डांवरच व्यवहार करावे लागत आहेत. टूर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी)चे माजी अध्यक्ष तथा हॉटेल व्यावसायिक राल्फ डिसोझा म्हणाले की, विदेशी पर्यटकांना डॉलरच्या बदल्यात कमी पैसे देऊन बोळवण करण्याचेही प्रकार काही मनी एक्स्चेंज आस्थापनांनी आरंभले आहेत. अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांच्याशी संपर्क साधला असता या दिवसात देशी पर्यटकांची संख्या लक्षणीय असायची. पर्यटकांना खोल्या मिळणे कठीण बनत असे परंतु या वर्षी मोसमाच्या सुरवातीलाच नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांना मंदीला सामोरे जावे लागले. इफ्फी जवळ येत असल्याने पुढील काही दिवसात पर्यटक वाढतील, अशी अपेक्षा असून त्यावरच व्यावसायिकांची मदार असल्याचे धोंड म्हणाले. अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रु झ कार्दोझ यांनी काही विदेशी पर्यटक माघारी गेल्याचे सांगितले. विदेशी चलन बदलून देणाऱ्या आस्थापनांमध्ये नोटांची टंचाई आहे.कसिनोंमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. गिऱ्हाईक नसल्याने काही कसिनोवाल्यांनी प्रवेश शुल्कही न भरण्याची मुभा दिलेली आहे.
गोव्यात हॉटेलांमधील आॅक्युपन्सी २५ टक्क्यांनी घटली
By admin | Published: November 16, 2016 6:46 PM