लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यात कठोर विरोधकांची कमतरता जाणवत आहे. त्याला कुठेतरी मीच जबाबदार आहे. मात्र मतदारसंघाच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये गेला. पक्षांतरामुळे राज्याचे राजकारण बदलले याची खंत, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी काल व्यक्त केली.
भाजपमध्ये आपण कुठल्याही अटींशिवाय गेलो आहोत. मतदारसंघाचा विकास हा एकच ध्यास समोर ठेवून पक्षांतर केले. विरोधात असताना विकासकामांना गती मिळत नाही, कामे होत नाहीत. निवडणूक वर्षात कामांसाठीच्या निविदा जारी केल्या जातात. त्यानंतर आचारसंहिता लागू होतात, पुन्हा कामे ठप्प होतात अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
लोबो म्हणाले, कळंगुट व शिवोली या दोन्ही मतदारसंघांचा विकास व तेथील लोकांची कामे व्हावीत, हाच आपला हेतू आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर मंत्रिपद मिळाले नाही, असे लोक म्हणतात. मात्र मंत्री झालो नाही म्हणून आपल्याला कुठलाही फरक पडत नाही. मागील एका वर्षात कळंगुट व शिवोलीत कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून यापैकी अनेक कामे मार्गी लागली आहेत. यात जल शुध्दीकरण प्रकल्प, रस्ते आदींचा समावेश आहे. कामे होत असल्याने आपल्याला समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधक म्हणून विजय एकटेच
राज्यात कॉंग्रेसचे सरकार यावे या हेतूने आपण कॉंग्रेसमध्ये गेलो होतो. विरोधात बसण्यासाठी नाही. मात्र मतदारांनी काँग्रेसला हवा तसा कौल दिला नाही. सध्या राज्याला कठोर अशा विरोधी पक्षाची कमतरता भासत आहे. पक्षांतर केल्याने याला कुठे तरी मी सुध्दा जबाबदार आहे. सध्या विजय सरदेसाई हेच विरोधकाची भूमिका निभावत आहेत, असल्याचेही ते म्हणाले.
पर्यटकांची सतावणूक थांबवा
वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या नावाखाली गोव्यात येणाया पर्यटकांची पोलिस सतावणूक करीत आहेत. पर्यटकांची सतावणूक थांबायला हवी. मुख्यमंत्र्यांकडे हा विषय आपण मांडला. मात्र ते पोलिस महासंचालकांनी तसा आदेश कढल्याचे सांगतात. अनेक ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन होत नसतानाही अडवली जात आहेत हे थांबायला हवे, असेही ते म्हणाले.