ख्रिस्तानंद पेडणेकर, केपे : कुडचडेत सातेरी मंदिराबाहेरील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड झाल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. तसेच मंदिराशेजारी असलेल्या सर्वोदय हायस्कूलच्या स्टोअर रुमचीही तोडफोड करून काही किरकोळ वस्तूंची चोरी करण्यात आल्याचे आढळले. या प्रकाराने संतप्त वातावरण झाले असून कुडचडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
कुडचडेतील सातेरी मंदिराबाहेरील मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. मंदिराचे पुजारी नेहमीप्रमाणे पूजेसाठी आले. तेव्हा ही घटना उघडीस आली. याबाबत सातेरी देवस्थान मंदिराचे अध्यक्ष बाबनी तेली यांनी माहिती देताना सांगितले की, हा प्रकार मध्यरात्रीनंतर घडला असावा. काल रात्री आरती करून मंदिर बंद करण्यात आले होते. पुजारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत जागे होते. यांदरम्यान एकदा मंदिराजवळ मोठा आवाज झाला. त्यापाठोपाठ परिसरातील कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्याने पुजाऱ्यांनी उठून पाहणी केली असता काही आढळले नाही. या घटनेमागचे कारण समजून येत नाही असे ते म्हणाले.
फक्त मंदिराबाहेरील मूर्तींची तोडफोड केली असे त्यांनी सांगितले. २० व २१ फेब्रुवारी रोजी मंदिराचा वर्धापनदिन आहे. त्यासाठी साफसफाई, रंगकाम सुरू आहे. मात्र, अचानक घडलेल्या वाईट कृत्यामुळे भाविक तसेच मंदिर समितीच्या सदस्यांना धक्का बसला आहे.
स्थानिक आमदार निलेश काब्राल यांनी मंदिराजवळील सीसीटीव्हीत ही घटना दिसली आहे. कुडचडे पोलिस संशयितांचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असे सांगितले.
दरम्यान, शेजारील सर्वोदय हायस्कूलच्या स्टोअर रुमचा दरवाजा तोडण्यात आला आहे. याबाबत आमदार काब्राल यांनी सांगितले की मी पूर्वी कुडचडे वाठारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. पण सध्या ते नादुरुस्त आहे. बंद सीसीटीव्हीबद्दल स्थानिक पोलिस निरीक्षकांबाबत खास बैठक घेऊ असे त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या महिन्यात कुडचडे वाठारात चोरीचा प्रयत्न झाला होता. एका सराफाच्या दुकानात चोरी झाली होती. आता चोरीच्या प्रयत्नात मंदिराबाहेर तोडफोड केली गेली असावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कुडचडेचे पोलिस निरीक्षक वैभव नाईक यांनी सांगितले की, या मंदिरात यापूर्वीसुद्धा अशी घटना घडली होती. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.