सूरज नाईक पवार, मडगाव: बहुचर्चित वंदे भारत ही रेल्वे कोकण मार्गावरून कधी धावणार याची प्रतीक्षा आता संपली आहे. मडगाव ते मुंबई मार्गावर धावणारी वंदे भारत रेल्वे शनिवारी ३ जून रोजी या मार्गावर धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या या रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करतील, तर मडगावच्या काेकण रेल्वेस्थानकावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे या रेल्वेला झेंडा दाखवतील. मडगावहून ही रेल्वे मुंबईतील श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंत धावणार आहे. कोकण रेल्वे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी ही माहिती दिली.
ही रेल्वे संपूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. हल्लीच मुंबई येथून छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगावदरम्यान गाडी चालविण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून ‘ट्रायल रन’ यशस्वीपणे घेण्यात आली होती. चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमधून ही रेल्वे तयार करण्यात आली आहे.
गोवा हे पर्यटन राज्य असल्याने या रेल्वेचा या राज्यालाही लाभ होणार आहे. तसेच शेजारच्या सिंधुदुर्ग राज्यातील पर्यटनालाही ही रेल्वे लाभदायक होईल. साधारणत: साडेपाचशे प्रवासी या रेल्वेतून प्रवास करतील. या रेल्वेला आठ डबे आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी घाटगे यांनी दिली.