पणजी : गोव्यात आढळलेल्या कोविड विषाणूच्या जेएन-१ व्हेरिएंट बाधित रुग्णांची नेमकी संख्या किती आहे या बाबतीत मोठी तफावत आढळून आली आहे. एकच संख्या दोन वेळा नोंद झाल्यामुळे दुप्पट संख्या झाल्याचे आढळून आले आहे.
गोव्यात कोविडच्या ६१ बाधितांपैकी जेएन-१ या व्हेरिएंटंचे ६३ रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हा व्हेरिएंट किती धोकादायक आहे किंवा त्याची लक्षणे काय? तसेच तो कसा पसरतो? या बद्दल निश्चित, अशी माहिती जागतिक आरोग्य संस्थेनेही जारी केलेली नाही. त्यामुळे गोव्यात इतक्या मोठ्या संख्येने दाखल झालेल्या या व्हेरिएंटमुळे चिंतेचे सावट पसरले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेली माहिती चुकीची असल्याचे गोवा आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले आहे. कारण, एकच अहवाल दोनवेळा नोंदविण्यात आल्यामुळे संख्या अधिक झाल्याचे आढळून आले आहे. मात्र त्यानंतरही अनेक नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवालही अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे आणखीही जेएन-१ चे बाधित आढळून येऊ शकतात. या विषयी अचूक संख्या लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
२४ तासांत शून्य बाधित
कोविड बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. परंतु सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या चाचणी अहवालात एकही कोविड बाधित आढळलेला नाही. एकूण २८ जणांची चाचणी अहवाल आरोग्य खात्याकडून करण्यात आली. सक्रिय बाधितांची संख्या ३७ आहे. तसेच चांगली गोष्ट म्हणजे अलीकडे कोविड बाधित झालेल्या एकाही रुग्णाला अजून इस्पितळात दाखल करावे लागले नाही. सर्व कोविड बाधित हे होम आयसोलेशनमध्ये राहून बरे होत आहेत, असे आढळून आले आहे.