पणजी : गोवा फॉर गिव्हींग आणि झिबोप यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवी, जुवारी तसेच इतर लहान जलाशयांमध्ये नौकानयन मोहीम राबविण्यात येणार आहे. ८ मे रोजी ‘मदर्स डे’च्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात झिबोप, गोवा राफ्टिंग क्लब आणि क्लब मरिन यांचे सहकार्य लाभणार आहे. राज्यातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत धोक्यात आले आहे. नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात सांडपाणी, तसेच मलनिस्सारणाचे पाणी मिसळत आहे. अशा गैरप्रकारांकडे त्वरित लक्ष देऊन पाण्याचे नैसर्गिक स्रोत आणि त्यांची शुद्धता जपण्याची आवश्यकता आहे. पाण्यात दूषित घटक मिसळत असल्यामुळे समुद्री जलचरांचे जीवनही धोक्यात आले आहे. तसेच प्रदूषित पाण्याचा मानवी आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. अन्यथा ही स्थिती हाताबाहेर गेल्यास मानवी जीवनास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गोव्यातील प्रमुख नद्या मांडवी, जुवारी तसेच इतर लहान-मोठ्या जलाशयांची स्थिती बिकट बनू लागली आहे. यासाठी निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या सान्निध्यात राहून त्याच्या जतनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे या पर्यावरणस्नेही संस्थांचे मत आहे. गोवा राफ्टिंग क्लबचे संस्थापक जॉन पोलार्ड हे झेंडा दाखवून म्हादई नदीत दुचाकी चालविण्यास सुरुवात करतील. या जलक्रीडा प्रकाराचे तज्ज्ञ मार्क बुट्ट हे बागा ते उतोर्डापर्यंत पाण्यात दुचाकी चालविणार आहेत. तसेच मदर्स डे निमित्त उतोर्डा किनाऱ्यावर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
गोवा फॉर गिव्हिंगचे मे मध्ये विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2016 2:25 AM