गोव्याला परशुरामभूमी म्हटले जाते. मांडवी किनारी परशुरामाचा पुतळा उभा करून भाजप सरकारने आपण परशुरामप्रेमी आहोत हे दाखवून दिले आहे. दुर्दैव एवढेच की, परशुरामासमोर मांडवीत कसिनो जहाजे डौलाने उभी आहेत. कसिनो संस्कृतीचा अलंकार पणजीच्या अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या राज्यकर्त्यांना वास्तविक असा पुतळाही उभा करण्याचा नैतिक अधिकार नव्हता. मात्र मुँह में राम और बगल में छुरी अशा पद्धतीने कधी कधी वागण्याची वेळ राजकारण्यांवर येते. गोवा म्हणजे दक्षिणेकडील काशी आहे, असाही दावा सत्तेतील काही नेते अलीकडे करतात. त्यांना गोव्याला पुन्हा काशी बनवायचे आहे आणि सनबर्नदेखील आयोजित करायचे आहे.
गोवा की सरकार अजीब है असे केंद्रातील नेते कदाचित कधी तरी म्हणतील, गोवा के लोग अजीब है असे ते म्हणणार नाहीत, कारण तसे आपले पंडित नेहरू म्हणून गेले आहेत. नेहरूंची प्रचंड अॅलर्जी असल्याने नेहरू जे काही बोलले, त्यात दुरुस्ती करून आताचे दिल्लीश्वर बोलतील हे वेगळे सांगायला नको, गोवा राज्याला पराक्रमी मंत्री, आमदारांची परंपराच लाभलेली आहे. सांस्कृतिकदृष्ट्या गोवा संपन्न आहे, तसाच तो राजकीय संस्कृतीबाबतही प्रगल्भ आहे. पोलिस स्थानकांवर हल्ले करणारेही येथे सत्तेची विविध पदे भूषवतात.
मिकी पाशेकोसारखा माजी मंत्री पूर्वी महिला अत्याचारप्रकरणी पकडला गेला होता. त्याला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुरुंगात जावे लागले होते. अगदी अलीकडच्या काळात मुरगाव तालुक्यातील एका राजकारण्याला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, त्याचा विधानसभा निवडणुकीत लोकांनी पराभव केला. महिलेशी संबंधित विषयच त्यावेळी त्या मंत्र्याविरुद्ध गिरीश चोडणकर, संकल्प आमोणकर आदींनी गाजवला होता. दोन महिन्यांपूर्वी अन्य एका मंत्र्यावरील आरोप व्हायरल झाला होता. अर्थात काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनीच तो आरोप केला होता. त्याबाबत नंतर माविन गुदिन्हो यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. माविनच्या कार्यालयाने पोलिसांकडेही त्या प्रकाराविषयी तक्रार केली होती. एका निष्पाप महिलेच्या विषयावरून आपल्याला अकारण बदनाम केले जाते असे माविनचे म्हणणे होते. प्रत्येक आरोप खरा असतोच असे नाही, हा वेगळा मुद्दा आहे.
तीन वर्षांपूर्वी गोव्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक विषय गाजला होता. मंत्रिमंडळ बैठकीतच शिवीगाळ झाली होती. आपल्याला शिवी घातल्याची तक्रार मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मीडियाकडे केली होती. त्यावेळी विजय सरदेसाई वगैरे कथित गोंयकारवादी आमदारांनी ढवळीकर यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. आता तेच सरदेसाई वगैरे मंत्री गोविंद गावडे यांना कोंडीत पकडण्यासाठी रात्रंदिवस घाम गाळत आहेत.
सध्या थंडीचे दिवस आहेत. काल पूर्ण गोवा शहारला, मंत्र्याच्या आवाजातील ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. तो आवाज आपला आहे की नाही, हे गोविंद गावडे यांनी अजून स्पष्ट केलेले नाही, मात्र हा ऑडिओ गेले तीन दिवस विविध आमदारांकडे फिरत आहे. विविध सामाजिक कार्यकर्त्याच्या व्हॉट्सअॅपवरून हा ऑडिओ सर्वत्र पोहोचला आहे. ट्रायबल कल्याण खात्याचे संचालक श्री. रेडकर यांना त्यांच्या कार्यालयात येऊन काय ते शिकवण्याची भाषा केली जाते. त्यांना अपशब्दही वापरला जातो, असे ऑडिओ ऐकणाऱ्याला वाटते. मात्र प्रत्यक्षात या प्रकरणी सत्य काय आहे, ते कदाचित संचालक श्री. रेडकर आणि मंत्री गोविंद गावडेच सांगू शकतील.
मंत्री गोविंद गावडे यांना सर्व बाजूने घेरण्यासाठी विरोधक टपलेलेच आहेत सभापती रमेश तवडकर यांची लढाईही अजून संपलेली नाही. तवडकर यांनी काही दिवसांपूर्वी कला संस्कृती खात्याच्या अर्थसाह्यावरून गोविंद गावडे यांच्यावर बॉम्बगोळा टाकला होता. ते प्रकरण मिटवताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनाही खूप धावपळ करावी लागली होती, सभापती तवडकर यांनी मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणे हा आमचा घरगुती मामला आहे, असे सांगून तानावडे यांनी आपली बौद्धिक चलाखी जगजाहीर केली होती. अर्थात तो विषय वेगळा, आता ही ऑडिओ क्लिप म्हणजेही आमचा घरगुतीच विषय आहे, असे सांगण्याची वेळ कदाचित मुख्यमंत्र्यांवर येऊ शकते. केवळ नाटकात शिवाजीची भूमिका केली म्हणून कोणी शिवाजी होत नाही, हे मंत्र्यांच्या लक्षात येईलच.