लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दिल्ली येथील जंतरमंतर येथे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला राज्यातील विविध महिला संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. या प्रकरणातील संशयित खासदाराला त्वरित अटक करून पीडित कुस्तीपटूंना न्याय द्यावा, अशी मागणी बायलांचो सादच्या निमंत्रक सबिना मार्टीन्स यांनी केली आहे.
पणजी येथील आझाद मैदानावर जमून विविध महिला संघटनांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शवला. यात बायलांची एकवट, अर्ज संस्था, अखिल गोवा मुस्लीम महिला संघटना व अन्य संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. मार्टिन्स म्हणाल्या, की दिल्ली येथे आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी देशातील अनेक पदके मिळवली आहेत. त्यामुळे त्यांना न्याय देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. महिला कुस्तीपटूंशी खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी गैरवर्तन केले. मात्र, त्याची दखल घेऊन त्यांच्यावर कुठलीही कारवाई सरकारने केली नाही. उलट न्याय मिळवण्यासाठी या कुस्तीपटूंना आंदोलन करावे लागत आहे, तर ज्यांनी हा अन्याय केला त्यांचे नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी जंगी स्वागत केले, अशी टीका त्यांनी केली.
जंतर मंतर येथे सुरू असलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकार करीत आहेत. त्यातूनच महिला कुस्तीपटूंना पोलिसांनी अटक केली. मात्र, ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. त्यांना अटक का होत नाही, त्यांनाही अटक व्हावी व अटक केलेल्या महिला कुस्तीपटूंना त्वरित मुक्त करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मार्टिन्स यांनी केली.