पणजी : खाण खात्याने खनिजाच्या वाहतुकीसाठी परवानगी देताना ज्या अटी लागू केल्या होत्या, त्या अटींचे वेदांता कंपनीने जाणीवपूर्वक पालन केले नाही, असा ठपका ठेवून गोवा सरकारच्या खाण खात्याने या कंपनीला १२ हजार मेट्रिक टन खनिजाच्या वाहतुकीसाठी दिलेला आयात व वाहतूक परवाना रद्द केला आहे. खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांनी गुरुवारी याबाबतचा लेखी आदेश जारी केला. कर्नाटकच्या खाण खात्याने केलेल्या ई-लिलावावेळी वेदांता लिमिटेड कंपनीने १२ हजार मेट्रिक टन खनिज माल (लंप्स) घेतला होता. १६ जुलै २०१६ रोजी वेदांता लिमिटेड कंपनीने हा खनिज माल गोव्यात आणण्यासाठी आयात व वाहतूक परवाना गोव्याच्या खाण खात्याकडून घेतला. परवाना देताना खाण खात्याने स्पष्ट अशी अट लागू केली होती. गोव्यातील या खनिज मालाच्या वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी मोले येथील तपास नाक्यावर या खनिज मालासाठी खाण खाते प्रवेश तिकीट देईल, अशी अट होती. या खनिज मालाचा उपयोग फक्त स्थानिक वापरासाठी व्हावा, असाही ही अट लागू करण्यामागील हेतू होता. त्यासाठी या खनिज मालाच्या वाहतुकीवर लक्ष ठेवणे गरजेचे होते. गेल्या २६ जुलै रोजी खाण खात्याने मोले तपास नाक्यावर आपला कर्मचारी वर्ग ठेवला; पण त्या दिवशी तपास नाक्यावर वेदांताच्या खनिज मालाच्या ट्रकांची नोंदच झाली नाही. खाण खात्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता वेदांताचे ट्रक गोव्यात आले व त्यांनी माल आमोणा येथील पिग आयर्न प्रकल्पाजवळ नेला. यामुळे खात्याने तत्काळ वेदांताचा १२,००० मेट्रिक टन मालाबाबतचा आयात व वाहतूक परवाना निलंबित केला. खाण खात्याच्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा देखील न करता हे ट्रक आमोणा येथे रिकामे केले गेले. खाण खात्याने केलेल्या सूचनांचे हे स्पष्टपणे उल्लंघन ठरते, असे खाण खात्याने म्हटले आहे. तसेच याची गंभीरपणे दखल घेऊन आयात व वाहतूक परवाना रद्दच केला. या कारवाईमुळे १२ हजार मेट्रिक टनमधील उर्र्वरित खनिज माल वेदांता कंपनी गोव्यात आणू शकणार नाही. नव्याने परवाना हवा असेल, तर आतापर्यंत आणून आमोणा येथे ठेवलेल्या खनिज मालाची वजन काट्यावर मोजणी करून घ्यावी लागेल. तसेच या मालाची ‘इन्व्हेंटरी’ तयार करावी लागेल. (खास प्रतिनिधी)
वेदांताला खात्याचा दणका
By admin | Published: July 29, 2016 2:09 AM