पणजी : ‘अटल सेतू’ असे नामकरण झालेला तिसरा मांडवी पूल वाहतुकीसाठी उद्यापासून (5 फेब्रुवारी) खुला होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ वरील हा पूल दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलामुळे राजधानी पणजी शहरातील वाहतुकीची कोंडी ब-याच अंशी कमी होणार आहे. रविवारी (3 फेब्रुवारी) राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी या पुलास भेट दिली.
मडगावहून म्हापशाकडे आणि विरुद्ध दिशेने जाणा-या वाहनांना या पुलाचा वापर करता येईल. फोंडा रॅम्प अजून तयार झालेला नाही त्यामुळे फोंड्याकडे जाणा-या वाहनांना जुन्याच मार्गाचा अवलंब करावा लागेल. या पुलाचे गेल्या रविवारी २६ जानेवारीला उद्घाटन झाले होते. त्यानंतर गेले आठ दिवस हा पूल लोकांना प्रत्यक्ष भेट देण्यासाठी खुला ठेवण्यात आला. हजारो लोकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या काळात पुलाला भेट दिली.
साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार फोंडा रॅम्प वगळता या पुलाचे काम 100 टक्के पूर्ण झालेले आहे. उद्या वाहतुकीसाठी हा पूल खुला केला जाईल.
- राष्ट्रीय महामार्ग १७ वर पुंडलिकनगर जंक्शन ते मेरशी जंक्शनपर्यंत या पुलाचे बांधकाम झालेले आहे. या पुलामुळे उत्तरेकडून येणा-या वाहनधारकांना राजधानी शहरात न येता थेट फोंडा, मडगांव, वास्कोला जाता येईल तसेच दक्षिणेकडून येणा-या वाहनांना थेट म्हापशाकडे येता येईल.
- जोड उड्डाण पुलासह एकूण ४४३४ मीटर लांबीचा आणि २१ मीटर रुंदीचा हा चौपदरी पूल आहे. नदीवर प्रत्यक्ष ६00 मीटरचा पूल हा केबल स्टेड आहे.
- बांधकाम क्षेत्रातील आघाडीची मेसर्स लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीने या पुलाचे काम केले आहे. तर मेसर्स एस. एन. भोबे अॅण्ड असोसिएटस ही सल्लागार कंपनी आहे.
- हा महत्त्वाकांक्षी पूल जीएसआयडीसीसाठी फ्लॅगशिप प्रकल्प ठरला आहे. गंज चढू नये यासाठी विशिष्ट प्रकारचे सीआरएस पोलाद बांधकामासाठी वापरण्यात आले आहे. मूळ पुलासाठी एम ६0 हे विशिष्ट काँक्रिट तर जोड उड्डाणपुलासाठी एम५0 हे विशिष्ट काँक्रिट वापरले आहे.
या पुलाचे नामकरण ‘अटल सेतू’ असे करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव या पुलाला देण्यात आले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २७ जानेवारीला या पुलाचे दिमाखदार सोहळ्यात हजारो लोकांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.