वास्को: जुआरी पुलाच्या बांधकामासाठी बनवण्यात आलेल्या ७० टन (७० हजार किलो) वनजाचा स्लॅबचा एक भाग बुधवारी (दि.१८) पहाटे बिर्ला महामार्गावर कोसळला. या मार्गावरुन स्लॅब घेऊन जात असलेल्या वाहनाचा तोल जाऊन वाहनासहीत हा स्लॅब रस्त्यावर व रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर पलटला. त्यामुळे या भागात वाहनांना बराच वेळ ट्राफीक जामची समस्या सोसावी लागली. दोन ट्रॉलीवर घातलेला हा स्लॅब ट्रक पुलर वाहन खेचुन घेत जात असताना या वाहनाच्या हायड्रोलिक यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे एका बाजूवर वजनाचा भार पडल्यामुळे पहाटे रस्त्यावर वाहनासहीत, ट्रॉली तसेच स्लॅब उलटून सदर अपघात घडला. अपघातावेळी या बाजूने अन्य दुसरे वाहन जात नसल्याने येथे होणारा मोठा अनर्थ टळल्याची माहिती वेर्णा पोलीसांनी दिली.
सदर अपघाताबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांना संपर्क केला असता बुधवारी पहाटे ६.१५ वाजता ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. जुआरी पुलाचे सध्या काम जोरात चालू असून यासाठी बांधलेला स्लॅबचा एक भाग दोन ट्रोलीवर चढवल्यानंतर त्याला ट्रक पुलर (क्र: एमपी ३९ एच ३२८५) खचून घेऊन जात असताना बिर्ला जंक्श्नसमोर पोचला असता ट्रकच्या हायड्रोलिक यंत्रणेत बिघाड आला. यामुळे ह्या वाहनाच्या एकाच बाजूने वजन आल्याने सदर ट्रक उलटण्याबरोबरच मागच्या बाजूने असलेल्या दोन्ही ट्रोली उलटून त्याच्यावर असलेला ७० हजार किलो वजनाचा स्लॅब ह्या रस्त्यावर व दुभाजकावर पडला. बिर्ला जंक्श्न च्या थोड्याच पुढे (पणजीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर) हा अपघात घडून स्लॅब रस्त्यावर आल्याने ह्या बाजूने जाणाºया वाहनांना काही प्रमाणात सकाळी ट्राफीक जाम समस्या निर्माण झाली. सदर घटनेची माहीती मिळाल्यानंतर वाहतूक पोलीसांनी येथे पोचून येथे निर्माण होत असलेली ट्राफीक जाम समस्या नंतर दूर केली. तसेच नंतर नवीन जुआरी पुलाचे काम पाहणाºया संबंधित प्रतिनिधींनी घटनास्थळावर पोचून वाहने उलटून रस्त्यावर पडलेला हा स्लॅब रस्त्याच्या बाजूला काढून ठेवल्याची माहीती पोलीस निरीक्षक देऊलकर यांनी दिली. बुधवारी पहाटे घडलेल्या ह्या अपघातात कुठल्याच प्रकारची जीवीतहानी झाली नसल्याची माहीती देऊलकर यांनी पुढे दिली.रस्त्याच्या बाजूला काढून ठेवलेला ७० हजार किलो वजनाचा स्लॅव ट्रोलीवर चढवण्याकरीता येथे क्रेन आणण्याची गरज असून बुधवारी उशिरा संध्याकाळी ह्या मार्गावरील वाहतूक वर्दळ कमी झाल्यानंतर क्रेन आणून सदर स्लॅब ट्रोली वाहनावर चढवल्यानंतर येथून नेण्यात येणार असल्याची माहीती देऊलकर यांनी शेवटी दिली.