पणजी - ‘स्वयंपूर्ण गोवा’ चित्ररथांसाठी वापरलेली महाराष्ट्र रजिस्ट्रेशनची दोन्ही वाहने अखेर सरकारने मागे घेतली आहेत. संबंधित इव्हेंट कंपनीला ही वाहने बदलण्याचा आदेश देण्यात आला आहे.
माहिती व प्रसारण संचालक दीपक बांदेकर यांनी हा आदेश काढला. ‘स्वयंपूर्ण गोवा’ चित्ररथ महाराष्ट्रात नोंदणी झालेल्या वाहनांवर स्वार होऊन गोवाभर फिरतोय याला प्रदेश काँग्रेसने आक्षेप घेतला होता. दोन्ही चित्ररथ रोखण्याचा इशाराही पक्षाचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दिला होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सध्या गोवा दौºयावर असलेले भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘इंप्रेशन’ मारण्यासाठीच महाराष्ट्र रजिस्ट्रेशनची वाहने चित्ररथांसाठी वापरल्याचा आरोप पणजीकर यांनी केला होता. गोव्यातील वाहने का वापरली नाहीत, असा त्यांचा सवाल होता.
माहिती संचालकांनी आदेशात असे म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र रजिस्ट्रेशनच्या वाहनांचा वापर ‘स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पनेशी विसंगत असल्याने ही वाहने हटवावीत आणि त्याजागी गोवा रजिस्ट्रेशनच्या वाहनांचा उपयोग करावा’. गोव्यात भाजप सरकारने राजकीय स्वार्थासाठी म्हादई नदीचा कर्नाटकशी सौदा केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड महामारीत सिंधदुर्गला आॅक्सिजन पाठवून गोव्यात प्राणवायुची कमतरता केली आणि कोविड रुग्णांचे खून केले. भाजप नेहमीच गोमंतकीयांना डावलण्याचेच काम करीत आहे, असा आरोप पणजीकर यांनी केला होता. सरकार गोमंतकीयांना डावलून बाहेरच्याना संधी उपलब्ध करुन देत आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.