पणजी: अल्पवयीन मुलीला शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात प्रख्यात पॉप गायक रेमो फर्नांडिस याला येथील बाल न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याच्या निवाड्यास समाजकार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित रेमो हे मूळ गोमंतकीय असून पॉप स्टार म्हणून त्याची जगभर ख्याती आहे. गेल्या 6 सप्टेंबर रोजी येथील बाल न्यायालयाने वरील प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, १ डिसेंबर २0१५ रोजी रेमो फर्नांडिस याचा मुलगा जोना याच्या कारला पर्वरी - म्हापसा रस्त्यावर अपघात झाला होता. या अपघातात मालवणहून जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियरच्या फेस्तासाठी कुटुंबीयांसमवेत पायी चालत यात्रेसाठी येणा-या एका अल्पवयीन मुलीला कारने गिरी येथे ठोकरल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिच्या पायाचे हाड मोडले होते. तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता रेमो फर्नांडीस याने त्या ठिकाणी जाऊन मुलीला शिविगाळ केल्याचा आरोप होता.
आगशी पोलिसांनी रेमो याच्यावर गोवा बाल कायदा कलम २ व ८ अंतर्गत वाईट वागणूक देणे व शिविगाळ करणे या आरोपांखाली गुन्हे नोंदवून आरोपपत्र ठेवले होते. पोलिसांनी ५३ पानी आरोपपत्रात २१ साक्षिदारांच्या साक्षीही नोंदविल्या होत्या. या साक्षीदारात आयरीश रॉड्रिग्स यांचीही साक्ष होती. बाल न्यायालयात या प्रकरणात अनेक सुनावण्या झाल्या होत्या व रेमो याने न्यायालयातही उपस्थिती लावली होती. आयरिश यांनी हे प्रकरण पुन: लावून धरताना बाल न्यायालयाच्या निवाड्यास आव्हान दिले आहे. हा आदेश रद्द बातल ठरवावा, अशी मागणी करताना हा आदेश न्यायाला धरुन नसल्याचा दावा केला आहे.