-नारायण गावस
पणजी: राज्यात वाढते गुन्हे पाहता राज्यातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करावी या मागणीचे निवेदन गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे मुख्य सचिवांना देण्यात आले आहे, असे गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी पत्रकार परिषदे घेऊन सांगितले.
दुर्गादास कामत म्हणाले, राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढत आहेत. बहुतांश गुन्हे शहरी भागाप्रमाणे आता ग्रामिण भागातही घडत आहेत. त्यामुळे आता रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व नगरपालिका तसेच पंचायतींनी आपल्या क्षेत्रात बसविलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चालतात की नाही याची पडताळणी करावी. कारण या सीसीटीव्हीमुळे अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यात लाभ होत आहेत. अनेक गुन्हे हे या कॅमेरामध्ये सापडले आहेत. त्यामुळे आम्ही मुख्य सचिवांना निवेदन दिले असून सचिवांनी सर्व जबाबदार खात्यांना असे आदेश द्यावे, असेही कामत म्हणाले.
कामत म्हणाले, राज्यात काही जे गुन्हे घडले आहेत त्यांचा शोध घेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पाेलिसांना सहकार्य लाभत आहे. काही दिवसांपूर्वी जे अनेक गुन्हे घडले आहेत त्यांचा शोध लावण्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा फायदा मिळाला आहे. पण काही ठिकाणी कॅमेरा आहे पण ते व्यवस्थित चालत नाही फक़्त बसविले आहेत. त्यांची नगरपालिका तसेच पंचायती पाहणी करत नाही. त्यामुळे आता मुख्य सचिवांनी त्यांना पाहणी करण्याचे आदेश देऊन ही सीसीटीव्हींची पडताळणी करावी तसेच ज्या प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत अशा ठिकाणी सीसीटीव्ही बसवावे असेही कामत म्हणाले.