पणजी : देश- विदेशी उद्योजकांना गोव्यात उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या व्हायब्रंट गोवा परिषदेचे फलित काय, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यातच शुभ वर्तमान आले आहे ते असे की, या परिषदेच्यावेळी बांधकामविषयक स्टॉल थाटलेल्या एका उद्योजकाला १३ कोटी रुपयांचा व्यवसाय मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. मलेशिया-गोवा थेट विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने बड्या विमान कंपनीने दाखवलेली तयारी तसेच शारजा विद्यापीठाचा गोवा विद्यापीठाकडे होणार असलेला करार नजीकच्या काळात प्रत्यक्षात येतील, असा दावा केला जात आहे.
या परिषदेत ५२ वेगवेगळ्या देशांमधील तसेच भारतातील १६ राज्यांमधील उद्योजक मिळून ६३00 पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले. ६१६ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी होते. ५ हजारांहून अधिक व्यावसायिक इन्कवायरी आल्या. आयोजक व्हायब्रंट गोवा फाउंडेशनचे विश्वस्त मनोज पाटील यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, ‘ परिषद होऊन केवळ दीडेक महिना उलटलेला आहे. एवढ्या लवकर फार अपेक्षा ठेवणे संयुक्तिक नव्हे. आंतरराष्ट्रीय उद्योजकांच्या १९ शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली. गोव्यात १00 कोटींचा आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटर उभारण्यासाठी कतार आयबीडी ग्रुपने तयारी दर्शविली आहे. स्मार्ट इंडस्ट्रीयल झोनसाठी सिंगापूरच्या कंपनीने उत्सुकता दाखवली आहे. संयुक्त अरब अमिरातच्या कंपनीने लिथियम बॅटरी उत्पादनाचा ६0 कोटी रुपये गुंतवणुकीचा कारखाना उभारण्याची तयारी दाखवली. ओमान बिझनेस फोरम ग्रुपने ५५ कोटी हॉटेल उभारणीत गुंतवणुकीची तयारी दाखवली. सौदी अरेबियाच्या एका कंपनीने८५ कोटींचे मनोरंजन केंद्र वजा हॉटेल उभारण्यास उत्सुकता दाखवली. संयुक्त अरब अमिरातने अन्य एका प्रस्तावाव्दारे ६६ मॅगावॅटचा वायूधारित वीज प्रकल्प तसेच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी दाखवली. हे सर्व प्रकल्प हळूहळू येतील, असा दावा आयोजक करीत आहेत.
११ विद्यार्थ्यांना मिळाल्या चांगल्या नोक-या
परिषदेत सहभागी झालेल्या प्रत्येक उद्योजक प्रतिनिधीकडे संवाद साधून पुढील वाटचालीसाठी आपला मार्ग निवडता यावा म्हणून प्रत्येक प्रतिनिधीमागे एक असे ३५0 विद्यार्थी नेमले होते. यापैकी ११ जणांना चांगल्या उद्योगांमध्ये नोकºया मिळाल्या आहेत. आणखी काहीजणांची बोलणी चालू आहे.
६0 महिला स्वयंसाहाय्य गटांना प्रशिक्षण
महिला स्वयंसाहाय्य गटांना त्यांच्या मालास बाजारपेठ मिळावी याकरिता मार्गदर्शनासाठी प्रख्यात मार्गदर्शन जगत शहा यांच्या मार्गदर्शनाची सोय या महिलांसाठी मिनेझिस ब्रागांझा सभागृहात करण्यात आली होती. ६0 महिला स्वयंसाहाय्य गटांनी यात भाग घेतला. दोन दिवस हा प्रशिक्षण कार्यक्रम झाला. मालाचे पॅकिंग कसे करावे याचीही माहिती दिली गेली. काही मालाच्या निर्यातीस वाव असल्याचे पटवून देण्यात आले.
आधी गुंतवणुकीसाठी विश्वास निर्माण व्हावा यासाठी पावले उचला - राज्य उद्योग संघटनेचे आवाहन
गोवा राज्य उद्योग संघटना या परिषदेपासून दूर राहिली होती. या संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘सरकारी सोपस्कार एवढे किचकटीचे आहेत की ते पूर्ण करण्यासाठी नाकीनऊ येतात. उद्योजकांना निमंत्रण देण्याआधी या सोपस्कारांमध्ये सुसूत्रता आणायला हवी त्यानंतरच उद्योजकांना निमंत्रण द्यावे. उद्योजकांमध्ये गुंतवणुकीसाठी विश्वास निर्माण व्हावा अशी कोणतीही गोष्ट येथे दिसत नाही. एकापेक्षा अनेक परवाने, या परवान्यांचे नूतनीकरण याबाबतची सक्ती निराशाजनक आहे. कारखाने व बाष्पक खात्याच्या परवान्याचे नूतनीकरण, अग्निशामक दलाच्या, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने आदींवरुन उद्योजकांना अक्षरश: जाचाला सामोरे जावे लागते. ही परिस्थिती आधी सुधारायला हवी. व्हायब्रंट गोवातील स्थिती ‘कंझ्युमर शॉपी’सारखी दिसली.’