पणजी - उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी (24 मार्च) दुपारी माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या दोनापॉल येथील निवासस्थानी भेट देऊन पर्रीकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्रीही होते. उपराष्ट्रपती नायडू हे सुमारे पाऊण तास पर्रीकर यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात, भाऊ अवधूत तसेच पर्रीकर यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत होते.
पर्रीकर यांच्या पार्थिवावर 18 रोजी अंत्यसंस्कार झाले. परंतु त्यावेळी त्यावेळी त्यांना गोव्यात येणे शक्य झाले नाही म्हणून आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी ते आले. माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर तसेच पक्षाचे अन्य स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. नायडू यांचे सकाळी गोव्यात आगमन झाले. दाबोळी विमानतळावर त्यांचे राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री प्रमोद सावंत व राज्याचे शिष्टाचारमंत्री मॉविन गुदिन्हो यानी स्वागत केले. त्यानंतर नायडू यांनी पर्रीकर यांच्या निवास्थानी भेट दिली आणि त्यानंतर दोनापॉल येथे एनआयओ सभागृहात शास्रज्ञांना संबोधले.