पणजी : इंग्रजी भाषेचा स्वीकार करावा पण मातृभाषेचा विसर नको. इंग्रजी भाषा हा आधार आहे, मात्र त्याची विचारसरणी हा आजार आहे. सांस्कृतिक मातृभाषेचा आधार घेऊन मातृभाषेच्या उन्नतेची जबाबदारी स्वीकारावी. संस्कृतीचे जतन व रक्षण करणे गरजेचे आहे. घरात, मित्रपरिवारांसोबत मातृभाषेतून संवाद साधावा. भारत हा मुळातच शांतताप्रिय व बहुभाषिक देश आहे. येथील भूगोल वेगळा, हवामान वेगळं, भाषा वेगळी, आचार-विचार वेगळे, तरीही देश एकसंघ आहे. ही भारताची खरी संस्कृती. इंग्रजी, रशियन, जर्मन, पोर्तुगीजसारख्या भाषा आवर्जून आत्मसात कराव्यात, पण त्याच्या वसाहतवादी विचारसरणीचा त्याग करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.
निमित्त होते, राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान गोव्याचा (एनआयटी) चौथा पदवीदान सोहळा. शुक्रवारी २८ सप्टेंबरला उपराष्ट्रपती नायडू व राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या उपस्थित हा सोहळा पणजी येथील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात झाला. या वेळी व्यासपीठावर प्रो. डॉ. गोपाल मुगेरया व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, देशाचा आर्थिक विकासाचा दर वाढलेला आहे. हे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक पाऊल आहे. २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात प्रतिभावावंताची कमी नाही. सगळ्यांना सरकारी नोक-या भेटू शकत नाहीत. त्यामुळे प्रतिभा व कौशल्याच्या जोरावर स्वयंरोजगार सुरू करावा. यासाठी सरकारी योजनांचा अवलंब करावा. देशाला स्वातंत्र्य मिळवून सुद्धा काहीप्रमाणात निरक्षरता, गरीबी, रोगराई, अत्याचार, शेतक-यांचे प्रश्न व त्यांची आत्महत्या, सामाजिक समस्या हे चिंतेचे विषय आहेत. यावर कायमस्वरुपी तोडगा हवा, असे ते म्हणाले.
‘आजही महिलांवर अत्याचार होतात. ही खूप खेदाची बाब. ज्या देशात नद्यांना महिला देवतांची नावे दिली आहेत, अशा ठिकाणी असे किळसवाणा प्रकार घडणे लजास्पद आहे. त्यामुळे महिलांचा आदर व त्यांच्या संरक्षणाची प्रतिज्ञा सर्वांनी घ्यावी, असेही नायडू म्हणाले.’ आजही देशात धर्माच्या नावाने दंगली व हिंसाचार होतो. दहशतवादींना कोणाताही धर्म, जात-पात, वर्णव्देष लागत नाही. हिंसाचार ही समाजाला लागलेली किड आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ हा गंभीर विषय आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थेतर्फे (एनआयटी, गोवा) आज मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली. मात्र आजारी असलेले मुख्यमंत्री पर्रीकर दिल्लीत उपचार घेत आहेत. त्यामुळे ही पदवी प्रो. डॉ. गोपाल मुगेरया यांनी स्वीकारली. या वेळी एनआयटीच्या बी.टेक, एम.टेक व पीएचडीचे पदवीधर मिळून सुमारे १३३ विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पदवीदान देऊन गौरवण्यात आले. यातील ८६ विद्यार्थ्यांना बी.टेकची, ४२ विद्यार्थ्यांना एम.टेकची तर ५ संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडीची प्रदान करण्यात आली.
‘शॉटकर्ट’ नको : नायडू
विद्यार्थी जिवनात किंवा आयुष्यात कधीही शॉटकर्ट मार्गाचा अवलंब करू नये, असा सल्लाही उपराष्ट्रपती नायडू या विद्यार्थ्यांना दिला. पदवी मिळाल्यानंतर ख-या आयुष्याला सुरुवात होते. जीवन हे शिक्षण प्रक्रिया असून त्याला खंड पडता कामा नये. जिवनात आव्हानांसोबत संधी सुध्दा येतात. त्याला धाडसाने सामोरे जावा. ध्येय व स्वप्न मोठं असावं, पण त्याला कष्टाची जोडही असावी. तरच ते सत्यात उतरेल. तत्त्वे व नैतिकत्ता यांना कधीही बगल देऊ नका, असे नायडू यांनी सांगितले.