पणजी : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू मंगळवारीगोवा भेटीवर येत आहेत. त्यांच्या हस्ते अंतराळ सहकार्याविषयीच्या एका परिषदेचे येथे उद्घाटन केले जाणार आहे. नायडू हे अलिकडे दुसऱ्यांदा गोवा भेटीवर येत आहेत. यापूर्वी ते एनआयटीच्या पदवीदान सोहळ्याला आले होते.
मंगळवारी दुपारी 1.50 वाजता उपराष्ट्रपतींचे आगमन होईल. सायंकाळी पाच वाजता नायडू यांच्या हस्ते सागर-डिस्कोर्स परिषदेचे उद्घाटन होईल. फोरम फॉर इंटीग्रेटेड नॅशनल सेक्युरिटी तथा फिन्स संस्थेने परिषदेचे आयोजन केलेले आहे. परिषदेविषयी फिन्सचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर व सरचिटणीस बाळ देसाई यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. इस्त्रोचे माजी चेअरमन डॉ. किरण कुमार यांच्यासह अनेक संशोधक, विविध देशांचे राजदूत वगैरे परिषदेत सहभागी होतील.
सागरी सुरक्षा व अंतराळ सुरक्षा ह्या महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. गोवा तर सागरी सुरक्षेसाठी पुढील शंभर वर्षे तरी, उत्तम ठिकाण बनून राहिल. गोवा-सावंतवाडी ते रत्नागिरीपर्यंतचा पट्टा हा त्यासाठी योग्य आहे, असे शेकटकर म्हणाले. देशातील तरुण संशोधन हे कर्तृत्ववान आहेत, असे ते म्हणाले. परिषदेत अंतराळाविषयी विचारांचे आदानप्रदान होईल. गटश: चर्चा होतील. जपान, इस्रायल, रशिया, फ्रान्स, अमेरिका, जर्मनीच्या राजदुतांना परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अंतराळ संशोधन, अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ अर्थव्यवस्था, अंतराळ-भूभाग आणि समुद्राचे एकत्रिकरण अशा विविध विषयांवर परिषदेच चर्चा होणार आहे. परिषदेत होणारे ठराव आणि शिफारशींची माहिती युनोलाही पाठविली जाणार आहे, असे देसाई यांनी सांगितले.
ISROचे चेअरमन डॉ. जी. साथिश रेड्डी हे समारोप सोहळ्य़ावेळी भाषण करतील. डॉ. अनिल काकोडकर, डॉ. किरण कुमार, डॉ. के. राधाकृष्णन आदी परिषदेत भाग घेतील. दि. 25 ऑक्टोबरपर्यंत परिषद चालेल.