लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : रायबंदर येथे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरू असताना एका खड्यात उतरलेल्या कामगारावर मातीचा ढिग पडल्याने ढिगाऱ्याखाली दबून त्याचा दुर्दैवी अंत आहे. अंगद पंडित (मूळ बिहार ) असे त्याचे नाव आहे. तर आणखी एक मजूर जखमी झाला आहे. या प्रकरणी काल उशिरा कंत्राटदारासह प्रकल्प पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दिवाडी फेरीबोट धक्क्याजवळ ही घटना घडली. रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभाग ते विठ्ठल मंदिरादरम्यान स्मार्ट सिटीअंतर्गत सांडपणी प्रकल्पाची वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. हे काम सुरू असताना खड्डयात उतरलेल्या या कामगारावर मातीचा ढिगारा पडल्याने तो खाली दबला गेला.
घटनेनंतर तातडीने जुने गोवे येथील अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले. जवानांनी अथक प्रयत्नानंतर तसेच जेसीबीच्या साहाय्याने माती बाजूला करून या कामगाराला बाहेर काढले व १०८ रुग्णवाहिनीतून त्याला गोमेकॉत पाठवले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर या घटनेत आणखी एक कामगार जखमी झाला आहे. विशेष म्हणजे जेव्हा ही घटना घडली, तेव्हा याठिकाणी स्मार्ट टीसीचा एकही अधिकारी किंवा सुपरवायझर तेथे हजर नव्हता.
नियोजनशून्य कारभार
मजूर मातीच्या ढिगायाखाली सापडताच सर्वांची भंबेरी उडाली. घटनास्थळी रुग्णवाहिकेलासुद्धा जाण्यासाठी वाट मिळली नाही. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिका कशीबशी घटनास्थळी पोहोचली. प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षेबाबत कोणतीच उपाय योजना नसल्यामुळे एका मजुराचा नाहक बळी गेला. या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी रायबंदरवासीयांनी केली आहे.
'ते' दोघेही तमिळनाडूचे...
रायबंदर येथील मातीचा ढिगारा कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्या प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कंत्राटदार माणिकंदन आणि साईट पर्यवेक्षक निसांत कुमार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याला आहे. दोघेही तामिळनाडूमधील आहेत. कंत्राटदाराने कामगारांच्या सुरक्षेची योजना न करता त्याला जीव धोक्यात घालून काम करण्यास भाग पाडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.