पेडणे झोनिंग प्लॅन विषयावरून वाद वाढणार याची कल्पना आठ दिवसांपूर्वीच आली होती. लोकलढा हा टप्प्याटप्प्याने पुढे न्यावा लागतो. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर व काही सरपंच, पंचांनी मिळून याचा लढा तसाच पुढे नेला. विशेषतः जीत यांनी आक्रमकता दाखवली. एरव्ही जीत यांचा स्वभाव हा आक्रमक किंवा हिंसक नव्हे. ते शांत, सौम्य स्वभावाचे, थोडे हसतमुख, मात्र पेडणे तालुक्यातील लोक रस्त्यावर उतरू लागलेत हे जीतने पाहिले व लढ्यात उडी टाकली. झोनिंग प्लॅनच्या विषयावरून पेटलेल्या रणात जर आपण उतरलो नाही तर आपण राजकीयदृष्ट्या मागे पडू याची कल्पना जीत यांना आली. ते पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत, पण त्यांनी झोनिंग प्लॅन विषयावरून आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व चालविले आहे, हे मान्य करावे लागेल.
पेडण्याचे लोक अजून पूर्ण जिंकलेले नाहीत. झोनिंग प्लॅनचा मसुदा रद्द करावा ही आरोलकर व लोकांची मागणी आहे. टीसीपी खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी मसुद्याला अंतिम रूप देण्यापूर्वी लोकांना विश्वासात घेतले जाईल असे गेल्या दोन-तीन दिवसांत सातत्याने जाहीर केले. मात्र अगोदरच आम्हाला विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न मांद्रेचे सरपंच तसेच आमदार विचारतात.
मसुद्यावर सूचना करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ विश्वजित यांनी करून दिली होती. लोकलढ्याची धग बसल्यानंतर विश्वजित यांनी मुदतवाढ देणे मान्य केले होते, पण मसुदा म्हणजे राक्षसच आहे असे चित्र तोपर्यंत तयार झाले होते. मसुद्याचा महाराक्षस आपल्याला खाऊन टाकील अशी भीती मांद्रे व पेडण्यातील लोकांमध्ये निर्माण झाली. मांद्रे मतदारसंघातील काही छोट्या-छोट्या राजकारण्यांनी या वादावर स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. काहीजण तटस्थ राहिले तर काहीजण कुंपणावर बसूनच मजा पाहू लागले. रमाकांत खलप व इतरांनी ऐनवेळी एन्ट्री करत जीत आरोलकर यांच्या लढ्याला आपला पाठिंबा जाहीर केला. परवा रविवारी लोकांनी मांद्रेत जमून शक्ती प्रदर्शन केले. झोनिंग मसुदा रद्द करा अशी हाक दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सोमवारी टीसीपी मंत्री विश्वजित यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली. आपण भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली, गृह मंत्र्यांशीही बोललो, झोनिंग प्लॅन स्थगित ठेवत आहे, असे विश्वजित यांनी घोषित केले.
एका बाजूने जीत आरोलकर व मांद्रेचे लोक आणि दुसऱ्या बाजूने विश्वजित राणे व माजी आमदार दयानंद सोपटे असे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. आरोलकर यांनी काही पंच सदस्यांना, माजी सरपंचांना आपल्याबाजूने ठेवले आहे. त्याचपद्धतीने सोपटे यांनी काही आजी माजी पंच, सरपंचांना आपल्याबाजूने उभे केले आहे. विश्वजित राणे यांच्यावर सोपटे यांनी पूर्ण विश्वास दाखवला व लोकांच्या सहभागातूनच प्रक्रिया पुढे नेली जाईल अशी भूमिका मांडली. तूर्त झोनिंग प्लॅन स्थगित ठेवण्याची विश्वजित यांची भूमिका सोपटे यांना मान्य आहे. या वादामुळे सोपटे यांना थोडे प्रकाशझोतात येण्याची संधी मिळाली. विश्वजित यांची भूमिका जीत आरोलकर तसेच मांद्रेचे सरपंच अमित सावंत व इतरांना मान्य नाही. मसुदा स्थगित ठेवण्यात अर्थ नाही, तो समूळ रद्दच करा अशी मागणी काल सायंकाळी आमदार आरोलकर यांनी लोकांना घेऊन केली. आरोलकर यांनी झोनिंग प्लॅनविरोधी लढ्यात आपले सगळे बळ वापरले आहे. अशावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत शांतपणे वाद पाहत आहेत. लोक रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्री सावंत झोनिंग प्लॅनप्रश्नी केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत.
वास्तविक हा राज्याचा विषय असला तरी, भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांना गोव्यात वाद पेटलेला नको आहे कारण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका घोषित झालेल्या आहेत. वातावरण संवेदनशील आहे. शिवाय येत्या २६ रोजी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी गोव्यात येणार आहेत. अशावेळी झोनिंग प्लॅनचा वाद वाढलेला सरकारला परवडणार नाही. आमदार आरोलकर यांचे मुख्यमंत्री सावंत यांच्याशी कायम चांगले संबंध राहिले आहेत. सध्याच्या वादाची झळ विश्वजित राणे यांना बसतेय. कदाचित लोकचळवळ वाढली तर विश्वजित हा मसुदा रद्द करण्याची भूमिकाच घेतील. ज्यावेळी मसुदा रद्द होईल, त्यावेळी ते लोकलढ्याचे पूर्ण यश ठरेल.