नवी दिल्ली : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या राजकारणात सक्रीय नाहीत. त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचं पथक त्यांच्या निवासस्थानी तैनात करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या निगरानीखाली मनोहर पर्रीकर 24 तास असतात. दरम्यान, 14 ऑक्टोबरपासून पर्रीकर सार्वजनिकरित्या कोठेही दिसून आले नाहीत. यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होऊ लागल्या आहेत. यादरम्यानच, काँग्रेस नेता जितेंद्र देशप्रभू यांनी पर्रीकरांसंदर्भात वादग्रस्त विधान केले.
जितेंद्र देशप्रभू यांनी टीका करताना म्हटलं की, गोव्याचे मुख्यमंत्री आहेत की नाही?, अशी आमच्या मनात शंका निर्माण होत आहे. खासगी किंवा सार्वजनिकरित्या ते कोठेही दिसून येत नाहीत. तुमच्याकडे जर मुख्यमंत्री नाहीत, तर मग त्यांचं श्राद्ध घाला. आम्हाला मुख्यमंत्री दाखवा तरी. आम्हाला पाहायचे आहे की, ते चालतफिरत आहेत का? बोलत आहेत का?, असे प्रश्न उपस्थित करत देशप्रभू यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
(मनोहर पर्रीकर हयात असल्याचे दाखवा; अन्यथा... गोवा काँग्रेसचे भाजपाला आव्हान)
14 ऑक्टोबरला मनोहर पर्रीकर यांना नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर सार्वजनिकरित्या ते कोठेही दिसले नाहीत. भाजपा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्रीकरांच्या निवासस्थानी डॉक्टरांचं पथक तैनात करण्यात आले असून हे पथक त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसनं आरोप लावला आहे की, मुख्यमंत्र्यांच्या आसपास असलेल्या अधिकाऱ्यांचा समूह त्यांच्या गैरहजेरीत अयोग्यपद्धतीनं निर्णय घेत आहेत. दरम्यान, जितेंद्र देशप्रभूनं असंही म्हटलं की, मनोहर पर्रीकर जिवंत असतील तर ते सत्ताधारी भाजपानं गोव्याच्या जनतेसमोर सिद्ध करुन दाखवावं.