पणजी - सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ आता राष्ट्रीय वृत्त वाहिनीवर दाखवला जात आहे. तो व्हिडिओ संरक्षण दलाने प्रसृत केला आहे, असे मला वाटत नाही. त्या व्हिडिओचा संबंध लोकसभा निवडणुकांशी निश्चितच लावता येत नाही, असे मत माजी संरक्षण मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गुरुवारी पर्वरी येथे मंत्रलयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
पर्रिकर संरक्षण मंत्री असताना सर्जिकल स्ट्राईक झाला होता. पर्रिकर म्हणाले, की सर्जिकल स्ट्राईक झाला आहे ही वस्तूस्थिती आहे. आमचे काही विरोधक ते मान्य करत नव्हते. आता दाखविली जाणारी व्हीडीओ फुटेज ही त्यासाठी उत्तर आहे. मी त्या व्हिडिओ फुटेजला वैधता देत नाही पण स्ट्राईक झाला होता व पाकिस्ताननेही ते नाकारले नव्हते. पाकिस्तानने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. कारण पाकिस्तानलाही स्वत:च्या अशा काही मर्यादा आहेत. पाकिस्तानने जर सर्जिकल स्ट्राईक झाला असे मान्य केले असते तर त्यांना भारतास प्रत्युत्तर देणे भाग पाडले असते. ते शक्य नाही.
पर्रिकर म्हणाले, की व्हीडीओ फुटेजमधून सर्जिकल स्ट्राईकचा फक्त काही छोटा भाग दाखविला जात आहे. तो कसा मिळाला, त्याचा स्रोत काय वगैरे कुणी शोधण्याची गरज नाही. ते का म्हणून शोधायला हवे? राष्ट्रीय स्तरावरील मीडियाला कुठून तरी तो मिळाला असेल. शेवटी भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता हे सत्य आहे. व्हीडीओ संरक्षण दलाने किंवा मंत्रलयाने प्रसृत केला असे मात्र मी म्हणत नाही. कारण त्यांनी तो प्रसृत केला असे कोणतेच संकेत मिळत नाहीत. लोकसभा निवडणुका खूप दूर आहेत. त्यामुळे निवडणुकांशी त्याचा संबंध लावता येणार नाही.
तुम्हाला ज्याप्रमाणे बातम्या मिळतात, त्याचप्रमाणे मिडियाला व्हिडिओ मिळाला असावा, तुम्हाला तरी त्या मागील स्रोत कशाला हवा आहे अशी विचारणा र्पीकर यांनी स्थानिक पत्रकारांकडे केली. दरम्यान, केंद्र सरकार आता निवडणुकांवर डोळा ठेवून मुद्दाम सर्जिकल स्ट्राईकचे भांडवल करू पाहत आहे व त्यासाठीच व्हीडीओ फुटेज आता लिक केली जात असावी, अशी टीका विरोधकांनी सुरू केली आहे.