पणजी : गोव्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविण्याचे काम अक्षय पात्रा फाउंडेशनकडे सोपवावे की नाही याबाबत सरकार व्दिधा मन:स्थितीत आहे. सध्या राज्यातील १0५ महिला स्वयंसाहाय्य गटांकडे हे काम आहे.वरील फाउंडेशनकडे हे काम सोपविल्यास स्वयंसाहाय्य गटांना फाटा द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी सरकारचे प्राधान्य आहे. परंतु हे काम फाउंडेशनकडे सोपवले गेल्यास १0५ स्वयंसाहाय्य गटांना काम राहणार नाही. बंगळूरु येथील इस्कॉन या आंतरराष्ट्रीय संस्थेशी संलग्न असलेल्या अक्षय पात्रा फाउंडेशनचा माध्यान्ह आहार कु जिरा येथील शैक्षणिक संकुलातील शाळांना चालू शैक्षणिक वर्षापासून प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आलेला आहे. राज्यातील इतर ठिकाणच्या शाळांनाही हा आहार पुरविण्याचे कंत्राट या फाउंडेशनला देण्याबाबत अभ्यास चालू आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी यात जातीने लक्ष घालून स्वयंसाहाय्य गटांकडून आरोग्यवर्धक आणि दर्जेदार आहार दिला जात आहे याची कटाक्षाने शहानिशा करीत आहेत. तसे आदेश त्यांनी शिक्षण खात्याला दिलेले आहेत. अक्षय पात्रा फाउंडेशनकडून आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगढ, गुजरात, कर्नाटक, ओडिशा, राजस्थान, तामीळनाडू, तेलंगणा व उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये मिळून सुमारे १६ लाखांपेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविला जातो. आहारात दिल्या जाणाºया अन्न पदार्थांमध्ये त्या त्या प्रांतानुसार बदलही करण्यात आलेले आहेत. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये भाताऐवजी चपाती, डाळ, भाजी व गोड पदार्थ दिला जातो.
गोव्यात माध्यान्ह आहार पुरवठ्याचे काम ‘अक्षय पात्रा’कडे सोपविण्याबाबत द्विधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 2:34 PM