पणजी - गोव्यात पट्टेरी वाघ नाहीच असे दहा वर्षापूर्वी सांगितले जात होते, पण हा समज खोटा ठरलेला आहे. 2013 साली म्हादई अभयारण्यात प्रथम पट्टेरी वाघाचे दर्शन घडले होते. आता प्रथमच मोले येथील भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानात वन खात्याला पट्टेरी वाघाचे दर्शन घडले. एकूण 240 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात वन खात्याचे अधिकारी परेश परोब व त्यांच्या टीमने गेले महिनाभर लक्ष ठेवले होते. खात्याकडे कॅमे-यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सगळीकडे कॅमेरे लावले नाहीत पण महावीर अभयारण्यात महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे लावून स्थिती न्याहाळली गेली. तसेच सगळा 240 चौरस किलोमीटरचा भाग हा वन खात्याच्या टीमने फिरून पाहिला. कुठे पट्टेरी वाघाच्या पाऊलखुणा दिसतात काय याचा अंदाज घेतला गेला. भगवान महावीर अभयारण्यात एके ठिकाणी कॅमे-यात वाघाचे दर्शन गेल्या 14 रोजी झाले. मात्र खात्याने ते जाहीर केले नव्हते. त्याची वाच्यता अभ्यासाअंती शनिवारी केली गेली. सरकारलाही खात्याने या घटनेची कल्पना दिली आहे. ती मादी असणे शक्य पूर्ण वाढ झालेला पट्टेरी वाघ कॅमे-यात दिसतो. त्याबाबतचे छायाचित्रही वन खात्याचे अधिकारी परोब यांनी जारी केले आहे. आपल्या टीमने घेतलेल्या कष्टांचे चिज झाले, असे परोब लोकमतशी बोलताना म्हणाले. ती नर की मादी हे स्पष्ट झालेले नसले तरी, अभ्यास सुरू आहे. पण ती मादीच असावी असे खात्यातील काही अधिका-यांना वाटते. भगवान महावीर अभयारण्यातील कॅमे-यात अनेक गवेरेडे, सांबर आदी प्राणी टीपले गेले आहेत. बिबटेही आहेत. 2013 साली प्रथम म्हादई अभयारण्यात पट्टेरी वाघ सापडला होता. मग तीन वाघ कॅमे-यांमध्ये तिथे आढळून आले होते. कर्नाटकमधून हे वाघ गोव्याच्या हद्दीत आले असावेत, असा युक्तिवाद त्यावेळी काहीजणांनी केला होता. म्हादई अभयारण्यात एका वाघाच्या हत्त्येची घटनाही प्रचंड गाजली होती.
गोव्यातील मोले अभयारण्यात प्रथमच पट्टेरी वाघाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 8:36 PM