लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण: राज्यातील सध्याचे सरकार केंद्र आणि कर्नाटक सरकारच्या हातचे बाहुले बनले आहे. सध्या मुख्यमंत्री खासगी जेट विमान घेऊन सर्वत्र फिरत आहेत. म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असून भावी पिढीसाठी ती सांभाळणे खूप गरजेचे आहे,' असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. चावडी - काणकोण येथील जुन्या बसस्थानकावर आयोजित केलेल्या सेव्ह म्हादई सेव्ह गोवाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रशांत नाईक, संदेश तेलेकर, फादर बोलमेक्स परेश, साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ, प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकोणकर, तारा केरकर, नगरसेवक शुभम कोमरपंत, माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई, शंकर पोळजी, जनार्दन भंडारी, जयेश व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
म्हादईच्या बचावासाठी आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध सरकार गुन्हे दाखल करीत आहे. नोकरीवर असलेल्यांची छळवणूक केली जात आहे. म्हादईचे पाणी वळविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने झालेला आहे. मात्र, जनता आता गप्प बसणार नाही. अन्यायाविरुद्ध नेहमीच काणकोणातील नागरिकांनी पुढाकार घेतलेला आहे. या तालुक्यातील लोक पुढे आले म्हणून गोवा, महाराष्ट्रात जाण्यापासून वाचला. कोकणी राजभाषा झाली. त्यामुळे म्हादई वाचवण्यासाठीसुद्धा अशाच संघटित लढ्याची गरज असून सर्वांनी हा लढा द्यायला हवा, असे सरदेसाई म्हणाले.
नेत्यांनी कर्नाटकात प्रचाराला जाऊ नये
गोव्यातील भाजप नेत्यांनी कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत प्रचाराला जाऊ नये. जे नेते जातील, त्यांना सूर्याजी पिसाळ ही बिरुदावली दिली जाईल असे प्रशांत नाईक यांनी सांगितले. जनार्दन भंडारी, संदेश तेलेकर, प्रतिमा कुतिन्हो, तारा केरकर, रामा काणकोणकर, शंकर पोळजी, राजेश सावळ यांनी सरकारवर टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"