मडगाव - ओपिनियन पोलच्या मुद्दय़ावरुन राजकारण करणारे गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर आणि मगोचे सुदीन ढवळकर हे दोघेही राष्ट्रवादाच्या नावाखाली अजूनही महाराष्ट्रवादच करत आहेत. ओपिनियन पोलच्यावेळी आपण लोकांबरोबर होतो असे म्हणणाऱ्यांनी त्यावेळी गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राहावे यासाठी मतदान केले की विलिनीकरणाच्या बाजूने, असा सवाल नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी केला.
ओपिनियन पोल संदर्भात वक्तव्य करून सरदेसाई यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी आपले शब्द मागे घेत माफी मागावी अन्यथा 26 जानेवारीच्या कार्यक्रमात त्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा वेलिंगकर यांनी दिला होता. त्याचा समाचार घेताना सरदेसाई म्हणाले, ज्यावेळी गोवा मुक्त झाला त्यावेळी त्यावेळचे प्रधानमंत्री पं. नेहरू यांनी भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले, असे वक्तव्य केले होते. त्याच धर्तीवर आपण ओपिनियन पोल जिंकल्यावर गोवा खऱ्या अर्थाने मुक्त झालो, असे वक्तव्य केले होते. गोवा मुक्तीने गोमंतकीयांना भारतीय बनविले. मात्र ते खऱ्या अर्थाने गोंयकार ओपिनियन पोलच्या निकालानंतरच झाले. हे माझे ठाम मत असून, त्यासाठी मी कुणाचीही माफी मागणार नाही. जर कुणाला काळे झेंडे दाखवायचे असतील तर त्यांनी अवश्य दाखवावेत त्यांनाही आम्ही पाहून घेऊ, असे प्रतिआव्हान सरदेसाई यांनी दिले.सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सरदेसाई म्हणाले, गोवा मुक्ती लढय़ातील स्वातंत्र्य सैनिकांबद्दल मला आदर आहे, किंबहुना गोवा मुक्ती लढा आणि विलिनीकरणविरोधी लढा या दोन्ही लढय़ांशी माझ्या कुटुंबियांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे मी स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणो शक्यच नाही. माझे घर गोवा मुक्ती लढय़ातील स्वातंत्र्य सैनिकांचा अड्डा होता त्यामुळेच माझे वडील ज्यावेळी अमेरिकेतून लिस्बनमध्ये गेले त्यावेळी त्यांचा पासपोर्ट पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अराष्ट्रीय असा ठपका ठेवून बाहेर फेकून दिला होता. पोर्तुगालच्या दफ्तरात अजूनही ही नोंद आहे. त्यामुळे राष्ट्रवादासंदर्भात कुणीही आम्हाला शिकवू नये, असे सरदेसाई म्हणाले.डॉ. जॅक सिक्वेरा यांनी गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी जे कार्य केले आहे त्याची दखल गोमंतकीयांना घ्यावीच लागेल. गोव्यातील वेगवेगळ्या गावातून डॉ. सिक्वेरा यांचे पुतळे उभे रहातील, असेही सरदेसाई यांनी ठामपणे सांगितले.