पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: राजस्थान येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी गोवा पोलिसांचे पथक तेथे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. तेथील विधानसभा निवडणुकीवेळी सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्वाची भूमिका बजावत असल्याची गोवा पोलिसांनी ही माहिती दिली. राजस्थान येथील अजमेर जिल्ह्यातील मसुडा गावात गोवा पोलिसांचे पथक तैनात केले आहेत. राजस्थान येथे २५ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान टप्प्याटप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी विविध राज्यांतील पोलिस कर्मचाऱ्यांना तेथे तैनात केले आहेत. यात गोवा पोलिसांचा सुद्धा समावेश आहे. पोलिसांचे सुमारे १०० हून अधिक कर्मचारी राजस्थान येथे निवडणूक ड्युटी बजावत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी यावेळी मसुडा येथे फ्लॅग मार्चही केला. तसेच ते निवडणूका शांततेत पार पडाव्यात यासाठी नियमितपणे गावात गस्तही घालत आहे. निवडणूक संपल्यानंतरच गोवा पोलिसांचे पथक पुन्हा राज्यात परतेल अशी माहिती देण्यात आली.