पणजी - संशयित विनोद देसाई हा माझा शेजारी आहे, परंतु तो केव्हाच माझा कर्मचारी नव्हता अशी साक्ष केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पणजी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात बुधवारी नोंदविली. देसाई नामक युवकाने नोकरी देण्याचे आमिष सांगून तसेच मंत्र्यांचा कर्मचारी असल्याचे सांगून लोकांकडून पैसे घेवून त्यांची फसवणूक केली असल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंदविला आहे आणि या प्रकरणात मंत्र्यांची ही साक्ष होती. विनोद देसाई याने मंत्र्यांच्या वशिल्याने नोकरी देण्याचे आश्वासन देऊन २ लाख रुपये घेतल्याची तक्रार मेरशी येथील एक युवक मर्विन फर्नांडीस यांनी केली होती. नाईक यांना या प्रकरणात साक्षीदार बनविले होते. त्यामुळे त्यांना साक्ष नोंदविण्याचा अदेश न्यायालयाने दिला होता. मागील आठवड्यात ही साक्ष नोंदली जाणार होती, परंतु काही कामामुळे त्या दिवशी न्यायालात उपस्थित राहू शकत नसल्यामुळे न्यायालयाकडे मंत्र्यांनी मूदत मागितली होती. न्यायालयाने नंतर १२ जून ही तारीख दिली होती. त्यानुसार मंत्री नाईक हे बुधवारी सकाळी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर राहिले. संशयित विनोद देसाईशी आपला काहीच संबंध नसल्याचे मंत्र्यांने आपल्या साक्षीत म्हटले आहे. तसेच तो आपला कर्मचारी कधीच नव्हता असेही म्हटले आहे. संशयित कधी आपले नाव सांगून, कधी मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून तर कधी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ््येकर यांचे नाव सांगून असे प्रकार करीत होता असे आता ऐकू येत असल्याचे त्यांनी न्यायालयातून बाहेर पडताना माध्यमाशी बोलताना सांगितले. अॅड आयरीश रॉड्रीगीश यांनी यात विनाकारण आपले नाव गोवले व तो आपला कर्मचारी असल्याचे सांगून आपली बदनामी केल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.विनोद देसाई हा नाईक यांचा कर्मचारी असल्याचे आणखी एका साक्षिदाराने म्हटले आहे व तशी साक्ष नोंदविली असल्याची माहिती अॅड आयरीश रॉड्रिगीश यांनी दिली.
विनोद देसाई माझा कर्मचारी कधीच नव्हता, फसवणूक प्रकरणात आयुष मंत्र्यांची साक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 6:09 PM