पणजी: गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना माजी मंत्री व ‘उटा’ नेते प्रकाश वेळीप यांनी सभापती रमेश तवडकर यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे सभापतींनी वेळीप यांच्यावर हक्कभंगाची कारवाई केली आहे. त्यांना विधानसभेत बोलावून जाब विचारणाला जाणार आहे. शुक्रवारी सभापतींनी सभागृहात याची माहिती देताना सांगितले की “वेळीप यांनी सभापती म्हणून माझ्या विशेष अधिकारांचा अपमान केला आहे. त्यामुळे सभागृहात बोलवून त्यांना या विषयी जाब विचारला जाणार आहे.
प्रकाश वेळीप यांनी पत्रकार परिषद घेऊन सभापतींवर गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते की “तवडकर यांनी काणकोणमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून विविध कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या शिक्षण संस्थेला कोट्यवधी रुपये अनुदान मिळाले आहे. त्यांच्या या कामाची वैधता सरकारने तपासावी”, या आरोपांची गंभीर दखल घेऊन सभापती तवडकर यांनी शुक्रवारी प्रश्नकाळ संपल्यानंतर वेळीप यांच्या विरूद्धच्या हक्कभंगाच्या कारवाईची माहिती सभागृहाला दिली.