पर्वरी : महामार्गावरून थेट दक्षिण गोव्याला जाणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी सोयीस्कर ठरलेला अटल सेतू मात्र राज्यात पहिल्यांदाच येणाऱ्या पर्यटक दुचाकी वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. नो एंट्रीचे सहजासहजी न दिसणारे फलक येथे असल्याने अनावधनाने या सेतूवरून जाणाऱ्या दुचाकी चालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. या पुलाच्या दोन्ही टोकाजवळ वाहतूक पोलिस कारवाईसाठी दबा धरून बसलेले असतात. येणाऱ्या सावजावर चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे दृश्य नेहमी दिसते. मात्र, यातून पर्यटन राज्याची बदनामी होत आहे.
आता पर्यटक हंगाम सुरु झाला आहे. मोठ्या संख्येने परराज्यातील युवक-युवती आणि विवाहित जोडपी राज्यातील किनारी पर्यटनाची मौजमजा करण्यासाठी येत असतात. पर्वरीतून पणजी शहरातील प्रवेश टाळून थेट मडगाव, फोंडा या दक्षिण गोव्याला जोडणारा अटल सेतू यासाठी महत्त्वाचा ठरतो. मात्र, या पुलाच्या दोन्ही टोकाकडे सहसा लक्ष जाणार नाही असे फलक लावले आहेत. पहिल्यांदाच उत्तर गोव्याच्या किनारपट्टीवर आलेल्या आणि दुचाकीवरून फिरणाऱ्या पर्यटकांना हे फलक दिसत नाहीत. परिणामी दुसऱ्या टोकाकडे उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात ते सापडतात.
दंडात्मक कारवाई झालेल्या काही पर्यटाकांना विचारले असता पुलाकडील मार्गदर्शक फलक दिसला नाही. त्यामुळे चुकून आम्ही अटल सेतूवर आलो असे त्यांनी नाराजीच्या सुरात सांगितले. सर्वांना ठळकपणे दिसेल असे फलक लावावे अशीही त्यांनी मागणीही त्यांनी केली.
राज्यात पर्यटक यावेत म्हणून पर्यटन खाते जाहिरातीद्वारे आणि अन्य मार्गाने देशभर आवाहन करते. परंतु येथे आल्यावर त्यांना कटू अनुभव घ्यावा लागतो. पर्यटक आणि पर्यटन व्यवसाय वाढावा असे वाटेल तर पर्यटन खाते आणि मंत्र्याने पोलिसांकडून पर्यटकांना त्रास होणार नाही याची दखल घेणे आवश्यक आहे.