पणजी : गोव्यातील सरकारी रुग्णालय, खासगी दवाखाने आणि अन्यत्र डॉक्टरांविरूद्ध जो हिंसाचार होतो. त्याचा निषेध करण्याच्या हेतूने गोव्यातील काही डॉक्टरांकडून सोमवारी दोनापावल येथील राजभवनबाहेरील जागेत लाक्षणिक उपोषण धरणे आंदोलन करण्यात आले.
भारतीय वैद्यकीय संघटनेच्या गोवा शाखेने या धरणे कार्यक्रमाचे नेतृत्व केले. या शाखेच्या अध्यक्ष मेधा साळकर, डॉ. शेखर साळकर तसेच संघटनेच्या काही सदस्य डॉक्टरांनी धरणे आंदोलनात भाग घेतला. गांधी जयंतीचे निमित्त साधून सकाळी आठ वाजता हे उपोषणात्मक आंदोलन सुरू करण्यात आले. राजभवनच्या परिसरात गोव्यातील डॉक्टरांनी केलेले हे पहिलेच आंदोलन आहे.भारतीय वैद्यकीय सेवेच्या गोवा शाखेचे एकूण दीड हजार सदस्य आहेत. केंद्र सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करावा, अशी मागणी शाखेने केली आहे.