पणजी : म्हादई पाणी तंट्याला कर्नाटकात हिंसक वळण लागले असून बुधवारी पहाटे हुबळी बसस्थानकावर कदंब महामंडळाची बस जमावाने जाळली. सुमारे २0 जण प्रवासी म्हणून बसमध्ये बसले आणि त्यांनी आत केरोसिन ओतून बस पेटवून दिली. या घटनेत बस ७0 टक्के जळून खाक झाल्याने १५ ते २0 लाख रुपयांची हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बुधवारी कर्नाटकात जाणाऱ्या काही बसगाड्यांच्या फेऱ्या कदंबने रद्द केल्या. पहाटे ४.३0 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती महामंडळाचे सरव्यवस्थापक (वाहतूक विभाग) संजय घाटे यांनी दिली. जीए 0३ एक्स 0३३२ क्रमांकाची बस हुबळीहून पणजीकडे येण्यासाठी फलाटाला लागली असता, विसेकजण बसजवळ आले आणि बस गोव्याला जाते का, अशी विचारणा केली. कंडक्टर होकारार्थी उत्तर देऊन एंट्री करण्यासाठी गेला आणि चालक चहासाठी खाली उतरला. ही संधी साधून प्रवासी म्हणून बसमध्ये बसलेल्या या आंदोलकांनी केरोसिन ओतून बस पेटवून दिली. अग्निशामक दलाचा बंब येईपर्यंत अर्धा तास गेला. तोपर्यंत बस ७0 टक्के पेटली होती. घटनेची माहिती मिळताच कदंब महामंडळाने बेळगाव, हुबळी, हॉस्पेट, बदामी, गुलबर्गा, रायचूर, बंगळुरू, बागलकोट तसेच हैदराबाद मार्गावरील सर्व बसगाड्या बुधवारी दिवसभरासाठी रद्द केल्या. उत्तर कन्नड भागात कारवार, मंगळुरूला तसेच म्हैसूरला आंदोलनाचा प्रभाव नसल्याने या मार्गावरील बसगाड्या चालू होत्या. म्हादई पाणी तंट्याच्या प्रश्नावर कर्नाटकच्या मंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधानांची भेट घेतली होती. म्हादईचे पाणी कर्नाटकात वळवू द्यावे, अशी त्यांची मागणी आहे; परंतु पंतप्रधानांकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. तसेच गोव्यानेही पाणी वळवू देणार नाही, अशी ताठर भूमिका घेतल्याने कर्नाटकातील आंदोलक संतापले आहेत. कर्नाटक एसटी महामंडळाच्या गाड्यांनाही त्यांनी लक्ष्य केले. ८ एसटींचे नुकसान करण्यात आले आहे. घाटे यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ही बस दोन वर्षांपूर्वीच ताफ्यात रुजू झाली होती. आंदोलन शांत होईपर्यंत कोणताही धोका पत्करण्याची महामंडळाची तयारी नाही. कदंबची दर्शनी काच कोणी दगड मारून फोडली, तरी २0 हजार रुपयांचा फटका बसतो, असे ते म्हणाले. कर्नाटकातील वातावरण पाहूनच कर्नाटकात आंतरराज्य मार्गावरील या फेऱ्या चालू कराव्यात की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
म्हादई वादाला हिंसक वळण
By admin | Published: August 27, 2015 2:10 AM