मडगाव : वीज अभियंता मारहाणप्रकरणी सडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेले नुवेचे आमदार मिकी पाशेको यांना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याच्या तक्रारीची न्यायालयाने गंभीरदखल घेतली आहे. दक्षिण प्रधान सत्र जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी तुरुंग महानिरीक्षक एल्वीस गोम्स यांना पाशेको यांच्या व्हीआयपी ट्रिटमेंटबाबत कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी ही तक्रार केली होती. पाशेको हे तुरुंगातून मोबाईलवर अनेकांशी संपर्क साधत आहेत. तसेच त्यांना अनेकजण भेटतात, अशा आशयाची तक्रार रॉड्रिग्स यांनी न्यायालयाकडे केली होती. पाशेको ज्या मोबाईल क्रमांकावर दुसऱ्याशी संपर्क साधतात त्याचा क्रमांकही तक्रारदाराने तक्रारीत नमूद केला होता. हा क्रमांक पाशेको यांच्या मालकीच्या फ्रान्सा ट्रॅव्हलर्स या कंपनीच्या नावे आहे. पाशेको यांना मिळत असलेली ही वागणूक बघता त्याची रवानगी कोलवाळच्या तुरुंगात करावी, अशी मागणीही केली होती. कायद्याने कैद्यांना जी बंधने आहेत तीच बंधने पाशेको यांनाही लागू व्हायला पाहिजे. केवळ ते राजकीय व्यक्ती असल्याने त्यांना नियमात शिथिलता दिली जाऊ शकत नाही, याकडे रॉड्रिग्स यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले होते. (प्रतिनिधी)
मिकींना तुरुंगात व्हीआयपी ट्रिटमेंट
By admin | Published: September 21, 2015 1:56 AM