लोकमत न्यूज नेटवर्क, सासष्टी : दक्षिण गोव्यातील हिंदुबहुल मतदारसंघांमध्ये झालेले मतदान हे सगळे काही भाजपसाठी नाही. सासष्टी तालुक्यात काँग्रेसचा उमेदवार ६० हजार मतांची आघाडी मिळवणारच. ही आघाडी भाजप कमी करू शकणार नाही. त्यामुळे दहा हजार मतांनी विरियातो फर्नांडिस जिंकतील, असे गणित काल प्रशांत नाईक यांनी खास 'लोकमत'शी बोलताना मांडले.
नाईक हे अनेक वर्षे दक्षिण गोव्याचे राजकारण जवळून पाहत आहेत. त्यांच्याकडे राजकीय विश्लेषकाचीही दृष्टी व कौशल्य आहे. नाईक हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे पदाधिकारी आहेत.
नाईक म्हणाले की, मडगाव मतदारसंघ वगळता सासष्टी तालुक्यातील अन्य कोणत्याच विधानसभा मतदारसंघात भाजपला आघाडी मिळणार नाही. उलट काँग्रेसची आघाडी बाणावली, वेळ्ळी नावेली येथे यावेळी वाढलेली असेल. आलेक्स सिक्वेरा यांनी भाजपसाठी कितीही काम केलेले असो पण नुवे येथे काँग्रेसची पाचशे मते देखील कमी होणार नाहीत. कुडतरी मतदारसंघातही काँग्रेसची आघाडी चांगली असेल. ६० हजार मतांची लीड सासष्टीत विरियातो यांना मिळेल, असे आपण म्हणताना फातोर्डाही जमेस धरतो. तिथे ४० टक्के अल्पसंख्यांक मतदार आहेत. तिथेही विरियातो यांना थोडी आघाडी असेल.
कुडचडे मतदारसंघात फिफ्टी-फिफ्टी स्थिती आहे. काणकोणमध्ये भाजपला आघाडी मिळेल पण ती प्रचंड नसेल. गेल्यावेळी मिळाली तेवढीच असेल. अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक आमदारांबाबत असलेली चीड देखील हिंदू मतदारांनी व्यक्त केली आहे. भंडारी समाजातीलही काहीजणांशी बोलल्यास तुम्हाला हे कळून येईल, असेही नाईक म्हणाले.
कामत म्हणतात तेवढी लीड मिळणार नाही
नाईक म्हणाले, की दिगंबर कामत म्हणतात तेवढी प्रचंड लीड मडगावमध्ये भाजपला मिळणार नाही. सासष्टीत एक ते दीड टक्का मतदान वाढले आहे. तिथे एकदम कमी झालेले नाही. दर वेळी असेच मतदान तिथे होत असते. भाजपला फोंडा तालुक्यात २० हजार मतांची आघाडी मिळेल. मडकईत १० हजार मतांची आघाडी असेल, असे आम्ही गृहित धरलेय. फोंडा व शिरोड्यात मिळून पाच-पाच हजार मतांची आघाडी असेल. भाजपला सावर्डेत १० हजार मतांची आघाडी मिळेल, सांगेतही मिळेल, पण केप्यात काँग्रेसला आघाडी मिळणार.