पणजी : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून गोव्यातील मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. राज्याची मतदारयादी अत्यंत व्यवस्थित असावी, यासाठी मंगळवारपासून व्यापक मतदार उजळणी केली जाणार आहे. गोव्यातील 1 हजार 642 बीएलओ म्हणजेच गट पातळीवरील अधिकारी 15 मेपासून घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची खातरजमा करून घेणार आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदार अस्तित्वात आहे की नाही, हे तपासून पाहण्याची मोहीम गोव्यात प्रथमच सुरू होत आहे.दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आल्तिनो येथील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून मतदार याद्यांची उजळणी केली जाते. यानंतर जानेवारीत अंतिम यादी प्रसिद्ध होते. काही मृत मतदारांची तसेच जे मतदार दिलेल्या पत्त्यावर सापडत नाहीत, त्यांची नावे वगळणे आणि जे मतदारयादीत आपले नाव नोंदवू इच्छितात, अशा नव्या मतदारांची नावे यादीत नोंदवणे, असे काम यादी उजळणी कार्यक्रमावेळी केले जात असते. दरवर्षी ही प्रक्रिया होत असते व त्यात सगळे बीएलओ भाग घेत असतात. यावेळी मात्र सप्टेंबरऐवजी 15 मे पासूनच मतदारयाद्यांच्या सर्वकष उजळणीचे काम सुरू होत आहे. लोकसभा निवडणुका 2019 मध्ये होणार असल्याने पूर्वतयारी म्हणून सप्टेंबरऐवजी मे महिन्यातच काम सुरू करणे गरजेचे आहे, असे निवडणूक कार्यालयातील सूत्रांनी लोकमतला सांगितले.राज्यात सध्या मतदारांची एकूण संख्या 11 लाख आहे. तीन वर्षांपूर्वी दहा लाख मतदारसंख्या होती. बहुतेक विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. जे गोवा सोडून गेले, ज्यांनी पोर्तुगाल किंवा अन्य देशाचा पासपोर्ट प्राप्त केला अशांची नावे यावेळीही मतदार याद्यांमधून वगळली जाणार आहेत. ते काम जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर होत असते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
गोव्यात लोकसभेची पूर्वतयारी; मंगळवारपासून मतदार पडताळणीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 1:44 PM