लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : वाढती महागाई, बेरोजगारी तसेच मूलभूत सुविधांच्या बाबतीत डबल इंजिन सरकारने दाखविलेली आमिषे या सर्वांचा विचार करून काणकोण मतदारसंघात भाजपाच्या विरोधातच मतदान झालेले आहे, असे दावा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला.
काणकोणातून इंडिया आघाडीच्या उमेदवाराला ११ हजार मते मिळतील, असा दावा जनार्दन भंडारी यांनी केला. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोवा फॉरवर्डचे विकास भगत, दशरथ गावकर, उमेश तुबकी, काँग्रेसचे गास्पार कुतिन्हो, क्लेस्टन व्हियेगश, दत्ता गावकर आणि इतर उपस्थित होते. भाजपकडे काणकोण पालिका तसेच पैंगीण, लोलये, आगोंद, खोतीगाव, श्रीस्थळ या पंचायतीचा पाठिंबा असतानाही ज्या पद्धतीने या ठिकाणी मतदान झालेले आहे, ते पाहता बहुतेक ठिकाणी सायलंट मतदारांनी भाजपावर राग व्यक्त केलेला आहे आणि ते ४ जून रोजी दिसून येईल, असा दावा गोवा फॉरवर्डच्या विकास भगत यांनी केला. इंडिया आघाडीला काणकोण मतदारसंघातून जे मतदान झालेले आहे, ते स्वाभिमानी नागरिकांचे मतदान आहे, असा दावा दत्ता गावकर, विकास भगत, गास्पार कुतिन्हो यांनी केला.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष
आपले लक्ष २०२७ च्या विधानसभा निवडणुकीवर असून सध्या जी आघाडी केलेली आहे, ती काणकोण मतदारसंघात तरी अशीच कायम राहील, असे मत भंडारी यांनी व्यक्त केले व सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले, अशी माहिती देण्यात आली.