राज्यात उद्या मतदान; उत्कंठा वाढली, उत्तरेपेक्षा दक्षिणेत जास्त चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2024 09:53 AM2024-05-06T09:53:12+5:302024-05-06T09:54:32+5:30

या खेपेला मात्र उत्तरेपेक्षा दक्षिण गोवा मतदारसंघातच जास्त चुरस आहे.

voting tomorrow for the goa lok sabha election 2024 more curiosity in the south than in the north | राज्यात उद्या मतदान; उत्कंठा वाढली, उत्तरेपेक्षा दक्षिणेत जास्त चुरस

राज्यात उद्या मतदान; उत्कंठा वाढली, उत्तरेपेक्षा दक्षिणेत जास्त चुरस

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर प्रचार काल, रविवारी सायंकाळी ५ वाजता संपला. मात्र, आता पडद्याआड हालचालींना वेग आला असून गुप्त भेटी चालूच आहेत. या खेपेला मात्र उत्तरेपेक्षा दक्षिण गोवा मतदारसंघातच जास्त चुरस आहे.

लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी उद्या, मंगळवारी मतदान होणार आघाडीचे उमेदवार यांच्यातच थेट आहे. भाजप व काँग्रेस प्रणित इंडिया लढत आहे. ११ लाख ७९ हजार ६४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

उत्तर गोव्यात भाजपच्या तिकिटावर श्रीपाद नाईक हे सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत तर दक्षिणेत भाजपने प्रथमच पल्लवी धेंपेच्या रुपाने महिला उमेदवार देऊन निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. तर इंडिया आघाडीसाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप, राष्ट्रवादी, उद्याठा यांनी एकत्र येत उत्तरेत माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांना तर दक्षिणेत नवीन चेहरा देत विरियातो फर्नांडिस यांना रिंगणात उतरवले आहे. आरजीतर्फे मनोज परब उत्तरेत तर रुवर्ट परेरा दक्षिणेतून नशीब आजमावत आहेत.

भाजपने दोन दिवसांत पक्षापासून दूर गेलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सावर्डेत माजी मंत्री दीपक पाउसकर यांना आपल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी राजी केले. आणखी काही जुन्या नेत्यांच्याही गुप्त गाठीभेटी घेतल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस तसेच इंडिया आघाडीतील अन्य एक पक्षांनीही आपल्या उमेदवारांसाठी पडद्याआड गाठीभेटी घेतल्या.

निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी आज, सोमवारी सायंकाळीच सर्व मतदान केंद्रांवर दाखल होतील. राज्यातील सर्व निवडणूक मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून पोलिस बंदोबस्तही तैनात आहे.

महिलांसाठी ४० पिंक बूथ

दोन्ही जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी ४० (प्रत्येकी २०) समर्पित मतदान केंद्रे (पिंक बूथ) असतील. या केंद्रांवर केवळ महिला कर्मचारीच असतील. ज्यामुळे महिला मतदारांना त्यांच्या लोकशाही अधिकारांचा वापर करण्यासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण मिळेल.

४० हरित मतदान केंद्रे

दोन्ही जिल्ह्यांमध्ये ४० हरित मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. हे इको-फ्रेंडली बूथ स्थानिक विक्रेत्यांकडील बांबू आणि नारळाच्या पानांसारख्या पर्यावरणीय टिकाऊ सामग्रीचा वापर करून सजवलेले आहेत. मतदारांना हिरव्यागार पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी ७५०० रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे.

सीआरपीएफच्या १२ तुकड्या

मुका वातावरणात मतदान पार पाडावे यासाठी सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय सुरक्षा दलाच्या १२ तुकड्या तैनात केल्या जातील. दोन तुकड्या आधीच बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या आहेत, असे चमां यांनी सांगितले.

ज्येष्ठांची आरोग्य तपासणी होणार

ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरी भागात जिथे वृद्ध मतदारांची टक्केवारी जास्त आहे, अशा ठिकाणी ८ मॉडेल मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक डॉक्टरांनी प्रदान केलेल्या आरोग्य तपासणीच्या मूलभूत सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

लिंबू पाणी अन् शीतपेय..

भर उन्हाळ्यात निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रांवर आयोगाकडून मतदारांसाठी लिंबूपाणी, ज्यूस, आदी शीतपेयांची व्यवस्था फरण्यात येणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ७६.८६ टक्के मतदान झाले होते, तर एप्रिल २०१९ साली झालेल्या निवडणुकीत ७४.७२ टक्के मतदान झाले होते. यावेळी आयोगाने ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाचे उहिष्ट ठेवले आहे.

मतदानाची वेळ: ७ मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायं. ६ वाजेपर्यंत

 

Web Title: voting tomorrow for the goa lok sabha election 2024 more curiosity in the south than in the north

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.