लोकमत न्यूज नेटवर्क साळः शिरगाव येथील लईराई देवीचा जत्रोत्सव दि. २४ एप्रिल रोजी असल्याने देवीच्या धोंड भक्तगणांत उत्साह संचारला आहे. अग्निहोमकुंडातून प्रवेश करायला मिळणार हा अनोखा प्रसंग परत अनुभवायला मिळणार असून हे दिव्य करायला मिळणार असे धोंड भक्तगण सांगतात. साळ येथीलही भक्तगणांनी गुरुवार दि. २० एप्रिलपासून व्रताला सुरुवात केली आहे. येथील सर्व धोंड भक्तगण देवी भूमिका मंदिर सभामंडपात राहून व्रत करतात.
नवयुवकांना उत्साह व आनंद देणारे व्रत आहे, असे युवा धोंडाने सांगितले. त्यात चंद्रकांत राऊळ, मधुकर बायकर, शंकर येरम हे ज्येष्ठ नागरिक व्रतात सहभागी झाले असून त्यांचे मार्गदर्शन लाभत आहे, असे मुकुंद परब, दीपक राऊळ, शांबा परब, संजय गावस, कल्पेश परब, आकाश नाईक सांगतात. त्यात छोट्या मुलांत सुद्धा उत्साह येऊन नवीन व्रतस्थ धोंड अथर्व घोगळे, वेद राऊत हे सुद्धा आहेत. चंद्रकांत राऊळ (७७) हे गेली एकावन्न वर्षे व्रत करीत आहेत; पण सध्या वृद्धापकाळाने ते घरी न राहता इतरांबरोबर मंदिरात व्रत करतात. भूमिका मंदिरात पंचवीस धोंड भक्तगण व्रत करीत आहेत.
रविवार दि. २३ रोजी रात्री मोठे जेवण असून सर्व धोंड भक्तगण आणि भाविक भोजनाचा आस्वाद घेत असतात. पाचही दिवस, रात्र, स्नान करून ओले राहून आहार भोजन करताना “श्री लईराई माता की जय " असा जयघोष करतात व हे व्रत करताना दुजाभावाला स्थान न देता " एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ " वागताना दिसतात, असे ज्येष्ठ धोंड मधुकर बायकर यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"