पणजी : सांत आंद्रे मतदारसंघाचे भाजपचे आमदार, नामवंत साहित्यिक, फर्डे वक्ते तथा उपसभापती विष्णू वाघ यांना उपचारासाठी गुरुवारी रात्री मुंबई येथील हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आले. वाघ यांच्या मेंदूचे कार्यान्विकरण पूर्ववत होणे गरजेचे असल्याने त्यांना मुंबईत हलविण्यात आल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
गेले चार दिवस वाघ हे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) होते. सोमवारी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गोमेकॉत आणण्यात आले होते. इस्पितळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आठ मिनिटे त्यांचे हृदय बंद पडले होते. गोमेकॉतील डॉक्टरांनी प्रयत्न करून हृदय कार्यान्वित केले. त्यांच्या मूत्रपिंडाचे कार्यही मंदावले होते. तथापि, गेल्या तीन दिवसांत त्यांचे हृदय व मूत्रपिंड कार्यान्वित झाले; पण मेंदू कार्यान्वित झाला नाही. त्यामुळे वाघ यांना मुंबईतील हिंदुजा इस्पितळात हलविण्यात आले.